सिन्नर; पुढारी वृत्तसेवा : नाशिक-पुणे महामार्गावर मोहदरी घाटात लक्झरी बसला आग लागण्याची घटना शुक्रवारी (दि.13) रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडली. सिन्नर नगरपरिषद व एमआयडीसीच्या अग्निशमन बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली गेली आहे.
सदर बस ही नाशिकहून कोल्हापूरकडे जात होती. मोहदरी घाटाच्या पहिल्या वळणावर बसला आग लागली. चालकाने बस थांबवल्यानंतर प्रवासी भराभर खाली उतरले. त्यामुळे जीवित हानी टळली. सिन्नर व एमआयडीसी पोलीस घटनास्थळी उपस्थित होते. जवळपास सव्वा तासानंतर आग आटोक्यात आली. या घटनेत कोणालाही इजा झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. तथापि बस आगीत भस्मसात झाली असून प्रवाशांचे साहित्य देखील जळून खाक झाले आहे.