धुळे येथील पोलीस कवायत मैदानावर अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन गुरुवारी (21 जून) उत्साहात साजरा करण्यात आला. ( छाया : यशवंत हरणे)
धुळे

Yoga Day 2025 | धुळे येथील पोलीस कवायत मैदानावर हजारोंच्या संख्येने साकारली योगसाधना

धुळे | धुळ्यात अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

पुढारी वृत्तसेवा

धुळे : जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, आंतरराष्ट्रीय योग दिन संयोजन समिती आणि विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने धुळे येथील पोलीस कवायत मैदानावर अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन गुरुवारी (21 जून) उत्साहात साजरा करण्यात आला. हजारोंच्या संख्येने नागरिक, विद्यार्थी, अधिकारी व योग साधक या कार्यक्रमात सहभागी झाले.

2014 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने 21 जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून घोषित करण्यात आला. त्यानुसार दरवर्षी जगभरात या दिवसाचे आयोजन उत्साहात केले जात आहे.

या वर्षी धुळ्यातील कार्यक्रमाची सुरुवात आमदार अनुप अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, महापालिका अप्पर आयुक्त करुणा डहाळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने झाली.

आमदार अग्रवाल यांनी आपल्या भाषणात योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी महत्त्व सांगत सर्वांना दररोज योगाभ्यास करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. संयोजन समितीचे ओम खंडेलवाल यांनीही मार्गदर्शन केले.

प्रशिक्षित योग मार्गदर्शकांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले.

प्रशिक्षित योग मार्गदर्शकांच्या नेतृत्वाखाली उपस्थितांनी ओमकार, प्रार्थना, विविध शारीरिक हालचाली, योगासने व प्राणायामांचे सत्र पार पाडले. यात ताडासन, वृक्षासन, अर्धचक्रासन, वज्रासन, भुजंगासन, शवासन, कपालभाती, नाडीशोधन, शितली, भ्रामरी प्राणायाम यांचा समावेश होता. कार्यक्रमाचा समारोप ध्यान व ओमकाराने करण्यात आला.

या प्रसंगी माजी महापौर प्रदीप कर्पे, ब्रह्मकुमारी सेवा केंद्राच्या गीता दीदी, भारत विकास परिषदेचे अध्यक्ष राजेश वाणी, सुधाकर बेंद्रे (गायत्री परिवार), एनसीसीचे कर्नल एस. के. गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते. शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी, योगाचार्य, वरिष्ठ नागरिक, शासकीय अधिकारी, कर्मचारी, महिला व युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत योग दिनाची भावना विविध योगासने साकारत केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT