धुळे: कौटुंबिक कलह आणि सासरच्या मानसिक व शारीरिक जाचाला कंटाळून एका विवाहितेने आपल्या दोन लहान मुलांसह विहिरीत उडी घेऊन जीवन संपविलेची हृदयद्रावक घटना धुळे तालुक्यातील निकुंभे शिवारात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृत विवाहितेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पती, सासू आणि सासऱ्यांविरुद्ध आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा सोनगीर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे.
संशयित तिघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान मयत विवाहिता व तिच्या दोन्ही मुलांचे धुळे जिल्हा रुग्णालयात इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. निकुंभे येथे तणावपूर्ण शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत गणेश नाना सुर्यवंशी ( रा. उडाणे, मूळ रा. इंदी हटटी, ता. साक्री) यांनी सोनगीर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यांची मोठी बहीण गायत्री आनंदा पाटील (वाघ) (वय-24) हिचे लग्न निकुंभे येथील आनंदा चतुर वाघ यांच्याशी 29 मार्च 2018 रोजी झाले होते. त्यांना 5 वर्षांचा मुलगा दुर्गेश्वर आणि 3 वर्षांची मुलगी दुर्गेश्वरी अशी दोन मुले आहेत.
लग्नाच्या वर्षभरानंतर गायत्रीला पती आनंदा चतुर पाटील, सासरे चतुर शंकर पाटील आणि सासू वेनुबाई चतुर पाटील यांच्याकडून घरगुती किरकोळ कारणांवरून मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता. तिला माहेरी फोन करू दिला जात नव्हता. घरकाम, स्वयंपाक यांसारख्या शुल्लक गोष्टींवरून पती-पत्नीच्या भांडणात सासू-सासरे तिला शिवीगाळ करून मारहाण करत होते. गायत्री माहेरी आल्यावर हा सर्व त्रास ती कुटुंबीयांना सांगायची. दरम्यान गायत्री हिने नवीन मोबाईल घेतल्याच्या कारणावरून तसेच पूर्वीच्या मानसिक व शारीरिक त्रासातून तिच्या सासरच्या मंडळींनी तिच्याशी भांडण करून मारहाण केली. या जाचाला कंटाळून बहीण गायत्री हिने तिचा मुलगा दुर्गेश्वर आनंदा पाटील (वय-5) आणि मुलगी दुर्गेश्वरी आनंदा पाटील (वय-3) या दोघांसह निकुंभे शिवारातील संजीव जाधव यांच्या शेतातील विहिरीत उडी मारून जीवन संपवले. असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
फिर्यादी गणेश सुर्यवंशी यांनी, पती आनंदा चतुर पाटील, सासरे चतुर शंकर पाटील आणि सासू वेनुबाई चतुर पाटील यांनीच आपल्या बहिणीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. मयत विवाहिता व तिच्या दोन्ही मुलांचे धुळे जिल्हा रुग्णालयात इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले.संशयीत तिघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मयत विवाहिता व तिच्या दोघी मुलांवर संध्याकाळी उशिरा शोकाकुल वातावरण निकुंभे तालुका धुळे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले .