Accident News file photo
धुळे

Dhule Accident | बिजासनी देवीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला; एसटी बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू

शिंदखेडा तालुक्यातील विरदेल गावाजवळ ॲपे रिक्षाला बसची जोरदार धडक; बसचालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

ST Bus Accident Woman Dies

धुळे, : बिजासनी देवीच्या दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या ॲपे रिक्षाला एसटी बसने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात वंदना ज्ञानेश्वर पाटील (वय ६०) यांचा मृत्यू झाला. ही घटना शिंदखेडा तालुक्यातील विरदेल गावाजवळ घडली. याप्रकरणी बसचालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिंदखेडा तालुक्यातील कुरुकवाडी येथील विनोद ज्ञानेश्वर पाटील हे त्यांचे वडील ज्ञानेश्वर साहेबराव पाटील आणि आई वंदना ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह ॲपे रिक्षाने (एमएच १८ डब्ल्यू २८५४) बिजासनी देवीच्या दर्शनासाठी निघाले होते. कुरुकवाडी येथून विरदेलमार्गे जात असताना त्यांची रिक्षा विरदेल गावाजवळील पुलाजवळ आली.

याचवेळी समोरून शिरपूर आगाराची राज्य परिवहन महामंडळाची बस (एमएच २० बीएल २४५७) भरधाव वेगाने येत होती. बसचालक नंदलाल सिताराम कोळी याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बसने थेट ॲपे रिक्षाला धडक दिली. या अपघातात वंदना पाटील गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर विनोद पाटील यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार बसचालक नंदलाल कोळी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६ (१), १२५ (अ), १२५ (ब), २८१, ३२४ (४) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT