धुळे : अंगणात खेळत असताना फुगा फुगवण्याचा प्रयत्न करीत असताना अचानक फुगा फुटला. या फुग्याचा काही भाग घशात अडकल्यामुळे आठ वर्षे वयाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना धुळ्यात घडली आहे. पोलीस ठाण्यात या संदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
धुळे शहरातील साक्री रोड परिसरातील यशवंतनगर भागात ही घटना घडली आहे. या परिसरातील डिंपल मनोहर वानखेडकर (वय आठ) वर्षे ही मुलगी अंगणात गल्लीतील लहान मुलांसमवेत खेळत होती. यावेळी ती फुगा फुगवण्याचा प्रयत्न करीत असताना अचानक फुगा फुटला. त्यामुळे फुग्याच्या काही भाग तिच्या घशात गेल्याने तिला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. ती जमिनीवर पडल्याने तिच्यासोबत खेळणाऱ्या मुलांनी मुलीच्या परिवारातील सदस्यांना ही माहिती दिली. वानखेडकर परिवाराने तातडीने हालचाली करीत वाहनातून मुलीला रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून डिंपल हिला मयत झाल्याचे सांगितले. घरात खेळकर असणारी डिंपल काही क्षणात निघून गेल्याने त्यांना शोक अनावर झाला. या संदर्भात पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.