पुढारी न्यूज नेटवर्क
दुचाकी लांबवणाऱ्या टोळीला अटक करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग. (छाया : यशवंत हरणे)
धुळे

Dhule Crime News | धुळे जिल्ह्यातून मोटार सायकली चोरणारे तिघे गजाआड

पुढारी वृत्तसेवा

धुळे : जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणावरून दुचाकी लांबवणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाला यश आले आहे. या गुन्ह्यातील तिघांकडून सुमारे नऊ लाख दहा हजार रुपये किमतीच्या 18 दुचाकी जप्त करण्यात आल्या असून सात गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.

धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दुचाकी चोरीला जाण्याचे सत्र सुरु आहे. याच दरम्यान पिंपळनेर पोलीस ठाण्यात राजेंद्र रामभाऊ सोनवणे यांनी देश शिरवाडे शिवारातील शेतात लावलेली दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार चोरट्याा विरोधात भादवी कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांना दुचाकी चोरणाऱ्या टोळीला गजाआड करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश दिले. पवार यांनी गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा अजंग वडेल येथे राहणारा एकनाथ हिरामण सोनवणे यांनी अन्य साथीदारांच्या मदतीने केल्याची पुढील माहिती मिळाली.

सोनवणे हा त्याच्या साथीदारांसह धुळे तालुक्यातील कुसुंबा बस स्थानकाजवळ उभा असल्याची माहिती देखील पोलीस निरीक्षक पवार यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी तातडीने हालचाली करीत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, उपनिरीक्षक अमरजीत मोरे, अमित माळी व प्रकाश पाटील यांच्यासह संजय पाटील ,संदीप सरग, संतोष हिरे, संदीप पाटील, मायुस सोनवणे, तुषार सूर्यवंशी, प्रकाश सोनार, योगेश जगताप, किशोर पाटील या पथकाला कुसुंबा येथे पाठवले.

पथकाने कुसुंबा येथील बस स्थानक परिसरातून एकनाथ हिरामण सोनवणे आणि आधार भरत भारत माळी या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता माळी हा व्यवसायाने फोटोग्राफर असून तो मालेगाव तालुक्यातील सावतावाडी वडनेर येथील रहिवासी आहे. तर सोनवणे हा मालेगाव तालुक्यातील अजंग वडेल येथील रहिवासी असल्याची बाब प्राथमिक तपासात निष्पन्न झाली. या दोघांची अधिक चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा बल्हाने येथे राहणारा विशाल पंडित अहिरे यांच्यासह केल्याचे कबुल केले. त्यामुळे पथकाने तातडीने साक्री तालुक्यातील बल्हाने येथून विशाल पंडित अहिरे याला ताब्यात घेतले. या सर्वांची चौकशी केली असता धुळे जिल्ह्यातून चोरी केलेल्या दुचाकी अजंग वडेल व बल्हाने शिवारात लपवून ठेवल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाने या दोन्ही ठिकाणावरून 18 मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या दुचाकी चोरी प्रकरणात धुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात एकूण सात गुन्हे दाखल आहेत. चोरट्यांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे.

SCROLL FOR NEXT