धुळे येथे गावठी कट्टा खरेदी-विक्री करणाऱ्या तिघांना अटक केली.  Pudhari News Network
धुळे

धुळे येथे पिस्तुलची खरेदी विक्री करणाऱ्या तिघांना अटक

पुढारी वृत्तसेवा

धुळे; पुढारी वृत्तसेवा: धुळे येथे गावठी कट्टा (पिस्टल) खरेदी-विक्री करीत असताना तिघांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने कारवाई केली. त्यांच्याकडून गावठी कट्ट्यासह मॅक्झिन जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अवैध शस्त्रांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी गोपनीय माहितीच्या आधारे पथकासह अवधान परिसरात कारवाईसाठी सापळा लावला. अवधान फाट्याजवळ मुंबई-आग्रा महामार्गावरील सर्व्हिस रोडवर गावठी पिस्तुलची खरेदी विक्री होणार असल्याची माहिती मिळाली.

हा प्रकार प्रकाश बारकु पावरा (रा. कणेरी, ता. शिरपूर) हा त्याच्या कब्जातील विना परवाना गावठी बनावटीचे पिस्टल स्ट्रायकर पिनसह, मॅगझीन व काडतुसासह सुरत येथील रहिवासी असणारे आकीब खान शफीक खान व मोईन इम्रान चक्कीवाला यांना विक्री करताना आढळून आला. या संदर्भात पोलिसांनी चौकशी केली असता सुरत येथील दोघांकडे पिस्तुल बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचे निदर्शनास आले. त्यांना ताब्यात घेऊन मोहाडीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, किशोर काळे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, पोउनि अमरजित मोरे, असई संजय पाटील, पोहेकॉ. आरीफ पठाण, पवन गवळी, रविकिरण राठोड, सुशिल शेंडे व निलेश पोतदार अशांनी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT