धुळे

बिर्‍हाड मोर्चाचा आवाज पोहोचला विधानसभेत, फडणवीसांनी दिलं आश्वासन

गणेश सोनवणे

धुळे; पुढारी वृत्तसेवा- धुळे नंदुरबार नाशिक जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी, कष्टकरी,बांधवाच्या विविध मागण्या आणि दुष्काळ जाहिर करावा या मागणीसाठी निघालेल्या बिर्‍हाड मोर्चाचा आवाज धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांनी विधानसभेत बुलंद केला. आ.कुणाल पाटील यांनी शेतकरी ,कष्टकर्‍याच्या मागण्यांचा एल्गार विधानसभेत पोहोचवला आहे. सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा आणि सत्याशोधक शेतकरी सभेचा बिर्‍हाड मोर्चा मुंबईत धडकण्याआधीच शासनाने मध्यस्थी करुन शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी आ.कुणाल पाटील यांनी विधानसभेत केली. दरम्यान आ.कुणाल पाटील यांनी विधानसभेत प्रश्‍न उपस्थित केल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मोर्चातील पदाधिकार्‍यांशी शासन पुन्हा चर्चा करील असे आश्‍वासन दिले.

आदिवसी शेतकरी कष्टकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा आणि सत्याशोधक शेतकरी सभेचा नंदुरबार-धुळे-मुंबई बिर्‍हाड मोर्चा निघाला आहे. 432 कि.मी.पायपीट करीत 12 दिवसात हा मोर्चा मंत्रालयावर धडकणार आहे. या बिर्‍हाड मोर्च्यात तब्बल दहा हजार आदिवासी शेतकरी सहभागी झाले आहेत. या मोर्चातील शिष्टमंडळ आपल्या मागण्यांविषयी चर्चा करण्यासाठी नागपूर येथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटायला नागपूर येथे आले,आदिवासी मंत्र्यांनी केवळ दहा पंधरा मिनटे चर्चा केली त्यामुळे या शिष्टमंडळाचे समाधान झाले नाही. त्यामुळे हा मोर्चा मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाला. आदिवासी,कष्टकरी बांधवाच्या विविध मागण्यांसाठी निघालेल्या बिर्‍हाड मोर्चाचा आवाज आज  आ.कुणाल पाटील यांनी विधानसभेत उठवला. त्यामुळे शेतकरी कष्टकर्‍यांचा आवाज बुलंद झाला. आज  नागपूर हिवाळी अधिवेशनात अति तातडीचा मुद्दा मांडतांना आ.कुणाल पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्र्यांनाच सवाल विचारला.अधिवेनशनात बोलतांना आ.कुणाल पाटील यांनी आदिवासी शेतकरी व कष्टकर्‍यांचा प्रश्‍न पोटतिडीकीने मांडत त्यांचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणी केली. हा मोर्चा मंत्रालयावर धडकण्या आधीच मागण्या मान्य कराव्या असेही आ.पाटील यांनी यावेळी सांगितले. आ.कुणाल पाटील यांनी बिर्‍हाड मोर्चाच्या मागण्या विधानसभेत मांडतांना सांगितले कि, नंदुरबार,धुळे,नाशिक जिल्हा पूर्णपणे दुष्काळ जाहिर करावा.अतिवृष्टी,गारपीट,नैसर्गिक आपत्ती,दुष्काळात नुकसान झालेल्या वनहक्क दावेदार आदिवासीसह सर्व शेतकर्‍यांना एकरी 30 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी,दुष्काळी उपाययोजना म्हणून पिण्याच्या पाण्याची व रोजगाराची व्यवस्था करावी, साक्री तालुक्यातील 2018 मधील दुष्काळाची शेतकरी व वनहक्क दावेदारांना नुकसान भरपाई तातडीने द्यावी. आदिवासी व इतर जंगलनिवासी वनहक्क कायदा 2006ची अंमलबजावणी करुन दावेदारांना हक्काचा सातबारा उतारा द्यावा अशा विविध मागण्या घेवून हा मोर्चा निघालेला आहे. त्यामुळे मोर्चा मुंबईत पोहचण्या आधीच शासनाने मध्यस्थी करुन आदिवासी बांधव,शेतकरी,कष्टकर्‍यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी आ.कुणाल पाटील यांनी यावेळी केली.

उपमुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा आणि सत्यशोधक शेतकरी सभेचा निघालेल्या बिर्‍हाड मोर्चाच्या मागण्या आ.कुणाल पाटील यांनी विधानसभेत मांडल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत सांगितले कि, बिर्‍हाड मोर्चाबाबत शासनाने दखल घेतली असून ना.गिरीष महाजन आणि ना.गावीत यांनी मोर्चातील पदाधिकार्‍यांशी चर्चाही केलेली आहे.तरीही शासन लवकरच त्यांच्याशी चर्चा करुन मार्ग काढेल असे आश्‍वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तरात दिले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT