पिंपळनेर (जि.धुळे) : मानव जन्म अतिशय दुर्लभ असून मानवाला मिळालेली सगळ्यात मोठी देणगी आहे. माणसाने माणसाशी मैत्रीपूर्ण व प्रामाणिकपणाचा भाव ठेवला तरच मानवी जन्माचे सार्थक होते. असत्य व अधर्माने वागणारा माणूस स्वतःफसतो व दुसऱ्यांनाही फसवतो असे सांगून सत्य अहिंसा, अपरिग्रह, धर्म, शुद्ध आचरण, आस्था या नितीमूल्यांचे पालन करणा-या व्यक्तीचे जीवन कृतार्थ होते असे प्रतिपादन तेरापंथ जैन धर्मसंघाचे अकरावे आचार्य महाश्रमणजी यांनी येथील नवनिर्मित जैन भवनाचे उद्घाटन प्रसंगी प्रवचनातून उपस्थित समुदायासमोर बोलताना केले.
आपल्या ओघवत्या शैलीत बोलताना आचार्य महाश्रमणजी म्हणाले, की माणूस म्हणून मिळालेला हा जन्म फार मोलाचा आहे. माणूस म्हणून वागताना व जगताना कोणाची फसवणूक करू नका. दुस-यांविषयी दुर्बुद्धी नको, कलापूर्ण जीवन जगण्याची शैली अवगत करा असे सांगून 72 कला जीवनात धर्म असला तर कलेला महत्त्व असते, प्रामाणिकपणा हा धर्माचा खरा आविष्कार आहे. अंतिम सुख प्रामाणिकतेत आहे, व्यसन करू नका, वाणीवर संयम ठेवा असे सांगितले. आचार्य पुढे म्हणाले की, नवनिर्मित तेरापंथ भवनाचे उद्घाटन झाल्याचे सांगत भवनात संस्कार, संस्कृती व धर्माचरणाचे काम करा. धार्मिक कार्यक्रम आयोजित करून पिढी घडवा असे आवाहन महाश्रमणजी यांनी यावेळी केले.
सामोडेहून पिंपळनेरकडे आचार्य महाश्रमणजी येत असताना जैन समाजासह इतरांनीही मोठ्या जल्लोषात रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून त्यांचे स्वागत केले. आचार्य महाश्रमणजी यांच्या दर्शनासाठी अलोट गर्दी लोटली होती. तर मुख्य बाजारपेठेत फुग्यांची भव्य कमान करून आचार्य व साधूंचे स्वागत केले. यावेळी जैन समाजातील पुरूष वर्ग व महिलांसह आबालवृद्ध सहभागी झाले होते. रात्री तेरापंथ भवनाचे उद्घाटन नमो अरिहंत... मंत्र म्हणवून करण्यात आले. यानंतर ज्ञानपीठ शाळेच्या पटांगणात प्रवचन झाले. यावेळी लहान मुलांनी व मुलींनी मनुष्य गती-देवगती हा संवादात्मक कार्यक्रम सादर केला. यावेळी सामोडेत दिनेश गोगड तर शहरात राकेश जैन यांनी स्वागतपर वाचन करीत कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमचा मंगलपाठाने समारोप करण्यात आला. या सोहळ्यात शहरातील सर्व समाज बांधव, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, पत्रकार व व्यापारी, आध्यात्मिक, धार्मिक आदी क्षेत्रातील नागरिकांनी सहभाग नोंदवला होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तेरापंथ सभा, तेरापंथ महिला मंडळ, सकल जैन समाज, नवयुवक मंडळ यांनी परिश्रम घेतले.