पिंपळनेर येथे विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांच्या महामेळावा उद्घाटनप्रसंगी न्यायमूर्ती तथा धुळे जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती एस. जी. मेहेरे. समवेत माधुरी आनंद, न्या. संदीप स्वामी आदी (छाया : अंबादास बेनुस्कर)
धुळे

शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ घ्या : Dhule Guardian Judge

विधी सेवा महाशिबीर : विविध शासकीय योजनांचा महामेळावा उत्साहात

पुढारी वृत्तसेवा

पिंपळनेर,जि.धुळे : सामाजिक न्याय म्हणजे जो वर्ग समाजाच्या मुख्य प्रवाहापासून लांब आहे. त्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने सामाजिक न्यायाच्या अनेक योजना उपलब्ध करून दिल्या आहेत. गरजू व पात्र व्यक्तींनी शासनाच्या या लोककल्याणकारी योजनांचा लाभ घेऊन आपली प्रगती साधावी, असे प्रतिपादन मुंबई उम्र न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा धुळे जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती एस. जी. मेहेरे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, धुळे व जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे यांचे संयुक्त विद्यमाने साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महामेळावाच्या उद्‌घाटनप्रसंगी न्यायाधीश मेहेरे बोलत होते.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण माधुरी आनंद, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. संदीप स्वामी, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर, साकी निलेश पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, तहसीलदार साहेबराव सोनवणे, अपर तहसिलदार दत्तात्रय शेजूळ, धुळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हा सरकारी वकील डी. वाय, तंवर, तालुका वकील संघाचे अध्यक्ष योगेश कासार यांच्यासह वकील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय योजनांची माहितीच नाही

न्यायमूर्ती एम.जी.मेहेरे म्हणाले, शासनाने समाजाच्या कल्याणासाठी मोठ्या प्रमाणावर विविध योजना अंमलात आणल्या आहेत. त्याचा लाभ गरजू व पात्र व्यक्तीनी ध्यावा.विधी सेवा प्राधिकरणामार्फत अनेक योजना राबविण्यात येतात देशपातळीवर सामाजिक सुरक्षा व मुख्य प्रवाहापासून दुर्लक्षित आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम या मेळाव्याच्या माध्यमातून करावयाचे आहे.ग्रामीण भागातील लोक हे शहरी भागातील लोकांपेक्षा जास्त जागृत असतात. परंतू त्यांना योजनांची माहिती नसते. त्यामुळे अशा मेळाव्याचा त्यांना निश्चित उपयोग होईल,असे त्यांनी सांगितले.

पिंपळनेर : शासकीय योजनांच्या महामेळाव्यात उपस्थित नागरिक

नागरिकांना कायदेविषयक मोफत सल्ला

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा माधुरी आनंद म्हणाल्या की, आज आपण मेळाव्यासाठी उपस्थित आहेत हा जो मेळावा संपन्न होत आहे. तो भारतीय राज्य घटनेच्या कलम 14 आणि 39 अ मध्ये कार्यान्वित केलेल्या विधी सेवा प्राधिकरण नियम 1987 नुसार महाराष्ट्र राज्य जिल्हा विधी सेवा अंतर्गत देण्यात येत आहे.तसेच सर्वांना समान न्याय तत्वानुसार कोणत्याही नागरिकांना न्याय देण्याचे काम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत करण्यात येते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत आर्थिक दुर्बल घटकांना तसेच ज्यांचे उत्पन्न 3 लाखा पेक्षा कमी आहे अशा नागरिकांना कायदेविषयक मोफत सल्ला देवून न्याय देण्याचे काम केले जाते. तसेच पिडीतांना नुकसान भरपाईही देण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

महामेळाव्यात लाभार्थी दिव्यांग व्यक्तीस प्रमाणपत्र प्रदान करताना न्यायमूर्ती मेहरे.

दुर्लक्षित घटकांसाठी मोबाईल ॲप, शासनाचे वेबसाईट उपलब्ध

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर म्हणाले, नागरिकांना लोककल्याणकारी योजनांची माहिती मिळावी, न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून कायद्याची माहिती व अंमलबजावणी कशी होते याबाबत सविस्तर ज्ञान मिळावे, तळागाळातील जनतेला शासनाच्या योजनांचा लाभ व्हावा, यासाठी विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा हा महामेळावा आयोजित करण्यात आला. यामुळे ग्रामीण स्तरावर प्रत्येक ग्रामस्थांना योजनांची व कायद्याची माहिती होईल. जिल्हा प्रशासनाच्यावतीने 350 पेक्षा जास्त योजना राबविण्यात येतात. आपल्या समाजातील जे दुर्लक्षित घटक आहेत. त्यात महिला, तरुण, दिव्यांग यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती शासनाच्या वेबसाईटवर तसेच मोबाईल ॲपवर देखील उपलब्ध असून योजनेबाबत काही अडचणी असल्यास जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा जेणेकरून प्रशासनामार्फत त्या सोडविण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

महामेळाव्यात बहुतांशी शासकीय कार्यालयांचे स्टॉल एकाच छताखाली आणण्यात आले असल्याने नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

वंचिताच्या रक्षणासाठीही पोलीस विभाग कटिबद्ध

जिल्हा पोलीस अधिक्षक धिवरे म्हणाले की, जिल्हातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस विभाग सदैव जागरूक आहे. पोलीस विभागामार्फत 112 डायलची सेवा दिली जाते. तसेच नागरिक महिला, मुलींच्या संरक्षणासाठी भरोसा सेल, दामिनी पथक सायबर सेल, पोलीसदादा, पोलीस दिदी असे उपक्रम राबविण्यात येत असून वंचिताच्या रक्षणासाठीही पोलीस विभाग कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

विधी सेवा व शासकीय योजनांच्या महामेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आंबा लागवड कार्यारंभ आदेश, संजय गांधी निराधार योजना अनुदान, गुराचा गोठा कार्यारंभ आदेश, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, शबरी आवास घरकुल योजना, माझी कन्या भाग्यश्री अनुदान, दिव्यांग व्हिलचेअर, पोल्ट्री शेड अनुदान, मका वैरण बियाणे वाटप, किराणा दुकानासाठी अर्थसहाय्य अशा योजनांचे लाभ लाभार्थ्यांना देण्यात आले.

महामेळाव्याच्या निमित्ताने महसूल, जिल्हा परिषद महिला विकास व बालविकास, आदिवासी प्रकल्प, कामगार विभाग, आरोग्य विभाग, पोलीस विभाग, जिल्हा पुरवठा विभाग, कृषी विभाग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, सामाजिक न्याय अशा विविध शासकीय विभागांच्या योजनांबाबत माहिती प्रदर्शित करणारे स्टॉल्स उभारण्यात आले. या स्टॉल्सला मान्यवरांनी तसेच लाभार्थ्यांनीही भेट देऊन उत्तम प्रतिसाद दिला. प्रारंभी मान्यवरांनी विविध विभागांच्या स्टॉलला भेट देवून पाहणी केली. महामेळाव्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तालुका वकील संघाचे अध्यक्ष योगेश कासार यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. संदीप स्वामी यांनी आभार मानले. सुवर्णा देसले, पुनम बेडसे यांनी सुत्रसंचालन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT