धुळे

सुलवाडे- जामफळ प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण करणार : गिरीश महाजन

अविनाश सुतार

धुळे, पुढारी वृत्तसेवा : धुळे शहराच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद व्हावी, असा आजचा दिवस आहे. वर्षानुवर्ष सामान्य धुळेकर पिण्याच्या पाण्यासाठी आठ, दहा दिवस वाट बघत होते. धुळे शहराची पिण्याच्या पाण्याच्या दुरवस्थेमुळे वेगळी ओळख निर्माण झाली होती. तो ठपका मिटविण्याचा हा क्षण सुवर्णक्षरात नोंदविण्यासारखा असा दिवस आहे. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले, याचा मला विशेष आनंद होत असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटन मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी अक्कलपाडा येथे आज (दि.२७) केले.

अक्कलपाडा येथील प्रकल्पातून १७० कोटी रुपयांच्या निधीतून साकारलेल्या धुळे शहर पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते झाले. धरण उद्भव योजनेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला, त्यावेळी महाजन बोलत होते.

या कार्यक्रमास खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल, महापौर प्रतिभाताई चौधरी, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ, माजी महापौर जयश्री अहिरराव, चंद्रकात सोनार, प्रदीप कर्पे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, नगरसेवक, लोकप्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार डॉ. भामरे म्हणाले की, धुळेकरांना रोज आणि मुबलक पिण्याचे पाणी देण्याचा २०१९ मध्ये दिलेला शब्द आम्ही पाळला आहे आणि याचा आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून अभिमान आहे. २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योजनेचे भूमिपूजन केल्यानंतर सर्व लोकप्रतिनिधींनी हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. सद्यःस्थितीत या अक्कलपाडा प्रकल्पात केवळ ६० टक्केच जलसाठा होत आहे. तो १०० टक्के व्हावा म्हणून प्रयत्नशील आहे. अक्कलपाडा येथील प्रकल्पाचा जलसाठा वाढविल्यास प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली जाते. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे भूसंपादन हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे.

आमदार जयकुमार रावल म्हणाले की, अक्कलपाडा योजना पूर्णत्वास आली असून, सुलवाडे-जामफळ योजनेचा प्रश्न होता. दरम्यानच्या काळात खंड पडला नसता तर आज या योजनेचेही लोकार्पण करता आले असते. धुळे जिल्ह्यासह लोकसभा मतदारसंघात १२०० कोटी खर्चाची कामे झाली आहेत. भविष्यात पाण्याचे मीटर लावून कोणाला किती पाणी मिळते ,तेही पाहिले जाईल आणि एक दिवसाआड पाणी पुरविण्याचे नियोजन होईल, असे रावल यांनी सांगितले. यावेळी महापौर प्रतिभाताई चौधरी, विजय चौधरी, अनुप अग्रवाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते मोदी आवास योजना, प्रधान मंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरुपात घरकुलांची चावी देण्यात आली. या कार्यक्रमाचे महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी प्रास्ताविक केले. जगदिश देवपूरकर व वाहिदअली यांनी सुत्रसंचलन केले. हिरामण गवळी यांनी आभार मानले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT