प्रातिनिधिक छायाचित्र File Photo
धुळे

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांसह विधवा महिलेची निर्दोष मुक्तता; साक्री न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Dhule News | तीन वर्षांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप

पुढारी वृत्तसेवा

पिंपळनेर, पुढारी वृत्तसेवा : राज्य परिवहन महामंडळाच्या सुमारे तीन वर्षांपूर्वी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप पुकारला होता. कर्मचाऱ्यांना कामाचे योग्य वाढीव वेतन मिळावे, म्हणून साक्रीतील एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केली होती. त्यानंतर मृत कर्मचाऱ्याची पत्नीही एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी झाली होती. याप्रकरणी विधवा पत्नीसह आंदोलक कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. साक्री न्यायालयात या खटल्याचे कामकाज होऊन न्या. मुग्धा गांगुर्डे यांनी मृत कर्मचाऱ्याची पत्नी तसेच सदर आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने अॅड. पुनम काकुस्ते यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. दरम्यान,न्यायालयाच्या निकालानंतर कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. (Dhule News)

सुमारे तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे चालक वाहक यांचा संपूर्ण महाराष्ट्रभर सुमारे सहा महिने कालावधीत राज्यव्यापी संप चालू राहिला होता.अनेक दिवस संपातील कर्मचारी यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नव्हत्या. त्यामुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली होती. अनेकांचे वेतन रखडले, घेतलेल्या कर्जापोटी अनेकांच्या बँकेचे हप्ते थकले. मुलाबाळांची तसेच कुटुंबातील सदस्यांची वाताहत झाली. याच दरम्यान साक्री (जि. धुळे) येथे राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी स्व. कमलाकर बेडसे यांनाही आर्थिक तणावामुळे आत्महत्या करावी लागली होती. याची तीव्रता अधिक वाढत जावून साक्री आगारातील चालक-वाहक तसेच आत्महत्याग्रस्त कर्मचारी यांच्या विधवा पत्नी संपात सहभागी झाले होते.

साक्री परिवहन महामंडळाचे तत्कालीन आगार व्यवस्थापक यांच्या मार्फत दि.7 डिसेंबर 2021 रोजी अर्चना खैरनार, योगिता बेडसे, माया मोरे, सुनील भामरे, जयवंत भामरे आदींसह इतर तेरा कर्मचाऱ्यांवर महामंडळ कामात हरकत घेणे, तसेच बसेस मार्गस्थ होण्यापासून रोखणे, महामंडळाच्या आर्थिक नुकसानीस कारणीभूत ठरणे आदी आरोप करत गुन्हा दाखल केला होता. साक्री न्यायालयात सर्व आरोपी कर्मचारी तसेच विधवा पत्नी यांच्या विरुद्ध खटला चालविण्यात आला. यात सरकारी पक्षातर्फे आगार व्यवस्थापक यांच्यासह एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आलेत.सर्व साक्षीदारांची साक्ष झाल्यानंतर साक्री न्यायालयाच्या प्रथमवर्ग न्यायाधिश मुग्धा गांगुर्डे यांनी सबळ पुराव्यांअभावी आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

वंचितांना न्याय मिळवून दिल्याचा आनंद केलेल्या कामाचा योग्य मोबदला . तसेच मिळणाऱ्या उत्पनातून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागावा. या न्याय्य मागणीसाठी आवाज उठविणाऱ्या कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना दोषी ठरविणाऱ्या प्रशासनाला कायद्याद्वारे उत्तर मिळाले असून न्याय देवतेचे आभार आणि वंचितांना न्याय मिळवून देता आला. याचा निश्चितच आनंद आहे.
अॅड. पुनम काकुस्ते-शिंदे, साक्री न्यायालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT