Songir Rural Hospital Issues
सोनगीर (धुळे) : धुळे जिल्ह्यातील सोनगीर ग्रामीण रुग्णालयाच्या ढिसाळ कारभार आणि गैरसोयींमुळे स्थानिक ग्रामस्थ अत्यंत संतप्त झाले आहेत. रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची गैरहजेरी, आवश्यक औषधांचा तुटवडा, रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न राहणे आणि रुग्णांना वेळेवर उपचार न मिळणे यांसारख्या समस्यांमुळे नागरिकांना मोठा फटका बसत आहे, अशा प्रकारच्या तक्रारी ग्रामस्थांकडून वारंवार करण्यात येत आहेत.
अनेकदा सोनगीर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपस्थित नसतात, ज्यामुळे आपत्कालीन रुग्णांना ताटकळत राहावे लागते. औषधे आणि इतर वैद्यकीय उपकरणांची कमतरता भासत आहे. रुग्णालय परिसरात CCTV कॅमेरे नाहीत , सिक्युरिटी नाही, कर्मचाऱ्यांकडून रुग्णांशी उद्धट वर्तन आणि उपचारांत दिरंगाई केली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सुविधा सुधारण्याबाबत आरोग्य विभागाकडून दुर्लक्ष होत आहे.
काल सोनगीरचे धनगर समाजाचे अध्यक्ष आणि बहुजन समाज शिक्षण मंडळाच्या वरिष्ठ महाविद्यालयाचे कर्मचारी ज्ञानेश्वर शंकर धनगर यांचा निजामपूर हून सोनगीर कडे येत येत असताना बोरीसजवळ अपघात झाला. धडकेत धनगर गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने सोनगीर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु रुग्णालयात उपचारासाठी वैद्यकीय उपकरणांची कमतरता, डॉक्टरांची अनुपस्थिती, रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध नसल्याने धनगर यांना प्रथोमपचार मिळू शकला नाही. नंतर डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.
संतप्त ग्रामस्थांनी व युवकांनी सकाळी रुग्णालयात मोठ्या संख्येने गर्दी केली आणि रुग्णालय प्रशासनाला वरील समस्यांबाबत जाब विचारला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. दारूच्या खाली बाटल्या रुग्णालयाच्या आवारात ग्रामस्थांना आढळून आल्या. याबाबत तक्रार देण्यासाठी ग्रामस्थांनी सोनगीर पोलीस स्टेशन गाठले. ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आणि धुळे ग्रामीण चे आमदार राम भदाणे यांना दूरध्वनी वरून सगळा प्रकार कळवण्यात आला.
ग्रामस्थांनी रुग्णालय प्रशासनावर तत्काळ चौकशीची व्हावी व योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. जबाबदारांवर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन आमदारांकडून देण्यात आले. तसेच संतप्त जमावाला प्रमोद धनगर व सोनगीर पोलिस ठाण्याचे प्रभारी तुषार देवरे यांच्या कडून कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई केली जाईल असे समजावत शांत करण्यात आले.
यावेळी प्रमोद धनगर, भटू धनगर, रमजान पिंजारी, किशोर पावनकर, पराग धनगर, विश्वास धनगर,दापूराचे माजी सरपंच किशोर पाटील, अविनाश धनगर, प्रदीप लांडगे, निहाल पिंजारी, तृजेश पाटील, हर्षल धनगर, लिलाधर धनगर, रविंद्र धनगर, ललित माळी, भूषण माळी, सागर माळी, गौरव माळी, विकास धनगर आणि ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.