सुलवाडे-जामफळ योजनेतून धुळे तालुक्यातील लघु, मध्यम प्रकल्प भरण्याचे नियोजन करावे 
धुळे

सुलवाडे-जामफळ योजनेतून धुळे तालुक्यातील लघु, मध्यम प्रकल्प भरण्याचे नियोजन करावे

पुढारी वृत्तसेवा

धुळे : सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेतून धुळे तालुक्यातील सडगाव परिसर, कापडणे-सोनगीर परिसरातील लघु व मध्यम प्रकल्प भरण्यात यावेत, तसेच बिलाडी, वडजाई, नरव्हाळ धरण भरण्यासाठी नियोजन करावे आणि नगाव शिवारातील चिंचनाला व गावनाल्यात पाणी सोडण्याचेही नियोजन करावे अशी मागणी करीत त्यासाठी आवश्यक तो सर्व्हे करण्याची मागणी आ.कुणाल पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकित केली.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आ.पाटील यांनी केलेली मागणी व सूचना लक्षात घेवून तातडीने सुक्ष्म नियोजन करुन सर्व्हे करण्याचे आदेश संबधित विभागाच्या अधिकार्‍यांना दिले.

धुळे तालुका हा अवर्षण प्रवण आणि टंचाईग्रस्त तालुका म्हणून गणला जातो. अपूर्‍या व असमान पावसामुळे धुळे तालुक्यातील लघु व मध्यम प्रकल्प कोरडेच राहतात त्यामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांना कायमच दुष्काळाचा सामना करावा लागतो. तसेच उन्हाळ्यात सुरुवातीपासूनच तालुक्याला पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. पार्श्‍वभूमीवर धुळे तालुक्यातील दुष्काळ आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी अस्तित्वातील लघु,मध्यम प्रकल्प हे स्थानिक नाल अथवा नदी जोड योजनेव्दारे जोडून पाणीसाठा वाढविणेबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात आ.कुणाल पाटील यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत विविध विभागांच्या अधिकार्‍यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चर्चा करतांना आ.कुणाल पाटील यांनी सांगितले की, सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेचा आराखडा तयार करतांना कालव्यातून धुळे तालुक्यातील तलाव भरण्याचे व शेतीसाठी पाणी देण्याचे नियोजन होते, मात्र नंतर त्यात बदल करुन बंद पाईपलाईनव्दारे पाणी देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पाईपलाईनव्दारे पाणी देतांना मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होऊन अतिरिक्त पाणीसाठा वाचणार आहे. त्यातून कापडणे, सोनगीर, सडगाव परिसरातील लघु व मध्यम प्रकल्प भरण्यासाठी सर्व्हे करण्यात यावा, तसेच नगाव गावाजवळील चिंचनाला व गावनाल्यात पाणी टाकल्यास या परिसराला सिंचनाचा मोठा लाभ होणार आहे. त्याचप्रमाणे बिलाडी, वडजाई, नरव्हाळ येथील सिंचन प्रकल्प सुलवाडे जामफळ योजनेतून भरण्यात यावा. या योजनाचा अतिरिक्त पाणीसाठ्यातून धुळे तालुक्यातील लघु व मध्यम प्रकल्प भरल्यास बहूसंख्य गावांचे सिंचन क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे लागणारा आवश्यक तो सर्व्हे करण्याची मागणी आ.कुणाल पाटील यांनी या बैठकीत केली. सर्व्हेचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे पाठवावा त्यास मंजूरी मिळविण्यासाठी पाठपुरावा मी करु ,असेही आ.पाटील यांनी सांगितले. आ.कुणाल पाटील यांची मागणी लक्षात घेऊन त्वरीत सर्व्हे करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करुन शासनास सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या बैठकित दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत आ.कुणाल पाटील यांनी सांगितले कि, अक्कलपाडा प्रकल्प पूर्ण झाला असून हे धरण 100 टक्के भरुन घेण्यासाठी जमीन संपादीत करण्यासाठी सुमारे 240 कोटी रुपांयाच्या निधीची आवश्यता आहे. त्याकरीता शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात यावा. तसेच लाटीपाडा धरणातील सैय्यदनगर पाटकालव्यातून धुळे तालुक्यातील शेतकर्‍यांना दिले जाणारे आरक्षित पाणी काढून घेण्याचे कारस्थान सुरु आहे. याविषयी शेतकर्‍यांमध्ये प्रचंड रोष आहे. म्हणून लाटीपाड्याचे धुळे तालुक्यासाठी आरक्षित पाणी धुळे तालुक्यातील शेतकर्‍यांनाच देण्यात यावे अशीही मागणी आ.कुणाल पाटील यांनी बैठकीत केली. तसेच जलसंधारण विभागामार्फत सुरु असलेल्या साठवण बंधार्‍यांच्या कामांना गती देण्याची मागणी करीत धुळे तालुक्यातील जुने साठवण बंधारे दुरुस्त करण्याची मागणी आ.कुणाल पाटील यांनी केली. त्याचप्रमाणे धामणगाव के.टी.वेअर बंधार्‍याच्या फळ्या तत्काळ टाकून धुळे तालुक्यातील इतर के.टी.वेअरमध्ये आवश्यक असलेल्या ठिकाणीही के.टी.वेअरमध्ये फळ्या टाकाव्यात. धुळे तालुक्यात अडीचशे वर्ष जुनी असलेली ऐतिहासिक फड बागायतीचे बंधारे व कालवेही दुरुस्त करण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना आ.कुणाल पाटील यांनी बैठकित दिल्या.बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, अधिक्षक अभियंता धुळे पाटबंधारे प्रकल्प मंडळ खांडेकर, कार्यकारी अभियंता धुळे पाटबंधारे विभाग वट्टे , कार्यकारी अभियंता सुलवाडे जामफळ विभाग अमरदिप पाटील,जिल्हा जलसंधारण अधिकारी रवि खाडे, वरिष्ठ भुवैज्ञानिक गिरीष बोहरे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT