धुळे : कारागृहातील बंद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्यात देशप्रेम, बंधुभाव जागृत करण्यासाठी सांकृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत सांस्कृतिक कार्य विभागाने कळविले होते. त्यानुसार राज्यातील 36 जिल्हा मुख्यालय ठिकाणी असलेल्या कारागृहामध्ये एकाच दिवशी, एकाच वेळी “जिवन गाणे गातच जावे ” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहीती कारागृह अधिक्षक एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, (कारागृह व सुधारसेवा ) यांच्या आदेशान्वये व पोलीस महानिरीक्षक (कारागृह) नाशिक विभाग, नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली धुळे जिल्हा कारागृहातील बंद्याकरीता “जिवन गाणे गातच जावे" हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन अधीक्षक एकनाथ शिंदे, यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. या सांस्कृतिक कार्यक्रमास धुळे जिल्हा कारागृहातील 215 बंद्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला.