धुळेच्या विकासासाठी ठोस उपायोजना राबवा, अशा सूचना खासदार बच्छाव यांनी केला. 
धुळे

धुळेच्या विकासासाठी ठोस उपायोजना राबवा : शोभा बच्छाव

मनपा आढावा बैठकीत खासदार बच्छाव यांच्या सूचना

पुढारी वृत्तसेवा

धुळे : धुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासनाकडून आवश्यक तो निधी उपलब्ध करण्यासाठी सकारात्मकपणे पाठपुरावा केला जाईल. धुळे महानगरपालिकेने मूलभूत नागरी सोयी सुविधा प्राधान्याने धुळेकरांना पुरविल्या पाहिजेत .रस्ते, गटारी ,स्वच्छतागृहे यांची मंजूर कामे वेगवानपणे करावीत, शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी ठोस उपायोजना राबविण्यात यावी, अशा सूचना खासदार डॉ.शोभा बच्छाव यांनी धुळे मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील व प्रशासनास आढावा बैठकीदरम्यान केल्या आहेत.

धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली धुळे महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या दालनात धुळे महानगरपालिका विकास कामे व कामकाजाचा आढावा बैठकीतून घेण्यात आला आहे. या बैठकीस मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. खासदार डॉ.शोभा बच्छाव यांनी यापूर्वी घेतलेल्या आढावा बैठकीतील सूचनेनुसार प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीचा आढावा जाणून घेतला .त्यानंतर धुळे शहरातील पाण्याचा प्रश्न गंभीर असून कायमस्वरूपी पाणी प्रश्न निकाली निघावा, पाणीपुरवठा व पाणी वितरणाबाबत आगामी २५ वर्षांचे नियोजन करण्यात यावे, त्यासाठी तापी पाणीपुरवठा पाईपलाईन बदलविणे किंवा नव्याने काही उपाययोजना करणे, अक्कलपाडा धरण प्रकल्पातून कायमस्वरूपी पाणीसाठा सुरळीतपणे धुळेकरांसाठी उपलब्ध करणे व पाणी वितरण व्यवस्थेचे पारदर्शी नियोजन करणे, याबाबत आढावा बैठकीत चर्चा विनिमय करण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत धुळेकरांना नियमितपणे स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना याप्रसंगी खासदार बच्छाव यांनी केल्या.

धुळे शहर हद्दीत नव्याने समाविष्ट वलवाडी परिसरात भूमिगत गटारी, रस्ते व विविध विकासकामे मंजूर करीत वेगवान पणे पूर्णत्वास आणावीत तसेच अमृत २ योजना व शहरातील विविध विकासकामे गुणवत्तापूर्ण करण्यात यावीत. धुळे शहरात सिटी लायब्ररी सुरू करावी त्यासाठी तसेच कॅन्सर हॉस्पिटल व आयुष हॉस्पिटलसाठी धुळे महानगरपालिकेने जागा उपलब्ध करून देत शासनास प्रस्ताव सादर करावा, अशा सूचनाही खासदार डॉ.शोभा बच्छाव यांनी याप्रसंगी केल्या आहेत.

शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून मोकाट जनावरांचेही प्रमाण अधिक आहे. जनभावना लक्षात घेता यासाठी तात्काळ उपायोजना कराव्यात. शहर स्वच्छ सुंदर रहावे यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी. विविध विकास कामांचे प्रस्ताव शासन दरबारी सादर करण्यात यावेत. राज्य व केंद्र शासनाकडून विकास कामे व त्यासाठी निधी मंजूर करण्यासाठी सकारात्मकपणे शासन दरबारी पाठपुरावा केला जाईल, असे देखील खासदार डॉ.शोभा बच्छाव यांनी यावेळी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT