धुळे | धुळे जिल्ह्याचे ठाकरे गटाचे माजी सह संपर्कप्रमुख हिलाल माळी यांनी अखेर शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्या समवेत अनेक पदाधिकाऱ्यांनी देखील प्रवेश केल्याने धुळे जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या उपस्थितीत या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे.
धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात विधानसभेची उमेदवारी न मिळाल्याने सह संपर्क प्रमुख हिलाल माळी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटाला सुटेल अशी अपेक्षा होती. मात्र या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीने राम भदाणे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे हिलाल माळी हे नाराज होते. त्यांनी राजीनामा देत या मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली. मात्र त्यांना यश आले नाही. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर माळी यांच्या भूमिकेकडे जिल्ह्यातील राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून होते .अखेर आज त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे. पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माळी यांच्या हातात भगवा ध्वज देऊन त्यांचे स्वागत केले. माळी यांच्या समवेत धुळे जिल्ह्यातील असंख्य पदाधिकाऱ्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे. या प्रवेश सोहळ्याच्या प्रसंगी शिवसेनेचे धुळे जिल्हाप्रमुख सतीश महाले यांची देखील उपस्थिती होती. या प्रवेश सोहळ्यामुळे धुळे जिल्ह्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे.