धुळे

Dhule news | सरकारची परराष्ट्र निती फेल झाल्याचा आरोप; शिवसेनेच्या ठाकरे गटाची निदर्शने

महागाई रोखण्यात सरकारला अपयश आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा देण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

धुळे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या आर्थिक धोरण व चुकीच्या परराष्ट्र नितीमुळे देश महागाईच्या खाईत लोटला आहे. गॅस व इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य गृहीणी, गोरगरीब जनतेचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल 107 तर डिझेल 94 रुपयांपर्यंत पोहोचल्याने येणार्‍या काळात वाहतुकीचे दर गगनाला भिडतील. त्यामुळे प्रत्येक चीज-वस्तु महाग होणार आहे. या सर्व प्रकाराला केंद्रातील पंतप्रधान मोदी यांचे चुकीचे धोरण कारणीभूत असल्याचा आरोप करीत आज धुळ्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाने निदर्शने करीत आपला रोष व्यक्त केला आहे.

धुळे येथील शिवतीर्थ चौकात जिल्ह्याचे संपर्क नेते तथा माजी आमदार अशोक धात्रक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना महागाई वाढीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चुकीचे धोरण कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेल, गॅस कमी वापरा, सोने खरेदी बंद करा, परदेश दौरे करु नका असे सल्ले दिले. परंतु स्वत: मात्र मोटारींच्या प्रचंड ताफ्यात रोड शो करतात. जनतेला आवाहन केल्यानंतर लगेच पाच युरोपीय देशांच्या दौर्‍यावर निघुन गेले. मोदी सरकारच्या कथनी व करणीमध्ये फरक असल्याने स्वत: भाजपच्या नेत्यांनी त्यांचे आवाहन गांभीर्याने घेत नाहीत. असा आरोप यावेळी ठाकरे सेनेने केला आहे. 11 ते 12 वर्षांपूर्वी हेच नरेंद्र मोदी यांनी डॉ.मनमोहन सिंग यांचे सरकार असतांना डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य 56 असतांना प्रचंड आकांडतांडव केले. घरगुती गॅस 414 रु. असतांना रान पेटवले होते.

आज रुपयाची वाटचाल 96 रु. झाली. आपला परराष्ट्रनिती फेल झाली. आपल्याला एकही मित्र देश उरला नाही. नेपाळ, मालदिव, बांगलादेश, श्रीलंका सारखे थिल्लर देश आपल्याला डोळे वटारतात. युरोपीयन देश आपल्याला मोजत नाही. रशिया, इराण सारखे सच्चे मित्र आपण गमावले. नरेंद्र मोदी हे विरोधी पक्ष, देशातील अर्थतज्ञ यांच्या अभ्यासाला किंमत देत नाही, त्याची किंमत देश व या देशातील जनता मोजते आहे. अशी टीका देखील यावेळी करण्यात आली.

इराणी-अमेरिका इस्त्राईल युध्दामुळे देशावर आर्थिक संकट ओढावणार आहे, त्यासाठी पूर्वनियोजन करुन उपाययोजना केली पाहिजे, असे तज्ञ मंडळी सांगत असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणाच्याही मताला किंमत दिली नाही, आणि पोकळ आव आणून देशात पुरेसा इंधन, गॅस साठा आहे. सर्व आल बेल आहे, असे खोटे सांगितले. कारण देशातील पाच राज्याच्या निवडणूकांवर त्याचा परिणाम झाली असता .

देशावर आर्थिक संकट असतांना मोदींनी निवडणूकांना प्राधान्य दिले. निवडणूका संपताच गॅसच्या किंमती वाढल्या. पेट्रोल डिझेल मध्ये आज जरी 3 रु.ची वाढ झाली असली तरी सरकार लोकांची परीक्षा पहात आहे. आपण जर आज विरोध केला नाही, तर 1 ते 2 महिन्यांत ही दरवाढ 18 ते 20 रुपयां पर्यंत जाईल, असे अर्थतज्ञ सांगत आहेत. या सर्व परिस्थितीची शिवसेनेला देखील माहिती असल्यामुळेच शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणाला आता हा कडाडून विरोध केला आहे. शासनाने ही दरवाढ मागे घ्यावी, गॅस इंधनावरील अधिभार कर कमी करुन लोकांना दिलासा द्यावा, ते जमत नसेल तर मोदी सरकारने राजीनामा द्यावा, जनतेचा बळी देवू नये, अशी टीका देखील यावेळी करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT