धुळे : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून तिचा खून करणाऱ्या आरोपीस शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने अटक केली आहे.
शिरपूर तालुक्यातील उमर्दा-प्रधानदेवी परिसरातील नाल्यात अनुबाई पमा पावरा यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यांच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने गंभीर वार झाल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणी मयताचे भाऊ आसाराम भायला सेनानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मयताचा पती पमा झंजाड्या पावरा याच्याविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा घडल्यानंतर आरोपी फरार झाला होता. पोलिसांचा शोध चुकवण्यासाठी त्याने स्वतःचा मोबाईल बंद ठेवला असल्याने त्याचा माग काढणे कठीण झाले होते. मात्र पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी आरोपीच्या घरासह संभाव्य ठिकाणी पाळत ठेवण्याच्या सूचना पथकाला दिल्या होत्या. परिसरावर सतत लक्ष ठेवण्यात येत असतानाच आरोपी आपल्या घराकडे येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
आरोपी कपडे व वैयक्तिक साहित्य घेण्यासाठी प्रधानदेवी येथील घरी येणार असल्याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे व गुन्हे शोध पथकातील अंमलदारांना तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले. पथकाने आरोपीच्या घराजवळ सापळा रचून गावात प्रवेश करताच त्याला ताब्यात घेतले व पोलीस ठाण्यात आणले.
पोलीस चौकशीत आरोपीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने लाकडी दांडक्याने तिच्या डोक्यावर तसेच हातपायांवर मारहाण करून खून केल्याची कबुली दिली आहे. पुढील तपास शिरपूर तालुका पोलीस करीत आहेत.