धुळे : शिरपूर तालुक्यातील बोरमळीपाडा शिवारात शेतामध्ये गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे .या संदर्भात पोलिसांनी दोन शेतांमध्ये छापा मारून सुमारे 76 लाखाचा गांजाचे पीक जप्त केले असून दोघांना अटक करण्यात आली आहे. तर पोलीस पथक आल्याचे पाहून एक जण पसार झाला आहे.
शिरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत दुर्गम भागातील वनजमिनीवर गांजा या अंमलीपदार्थयुक्त वनस्पतीची लागवड केली जाते. त्याविरोधात गोपनिय माहिती काढुन अशा पिकांची लागवड करणाऱ्या व त्याला प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तिंविरुध्द कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गोपनीय माहिती काढण्यास सुरुवात केली. यात बोरमळीपाडा गावाजवळ भोईटी शिवारात वनजमिनीवर संतोष ग्यानसिंग पावरा व रामप्रसाद हुरजी पावरा याच्या मदतीने गांजा या अंमलीपदार्थयुक्त वनस्पतीची लागवड केली आहे अशी माहिती मिळाली. त्यावरुन पो.नि. जयपाल हिरे यांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया राबवुन छापा कारवाई केली असता संतोष ग्यानसिंग पावरा , रामप्रसाद हुरजी पावरा हे गांजा पिकाची लागवड करुन राखण करीत असताना मिळुन आले.
तसेच या ठिकाणापासुन जवळच काही अंतरावर असलेल्या वनजमिनीवर भावसिंग काशिराम पावरा रा. बोरमळीपाडा याने देखील गांजा पिकाची लागवड केल्याची माहिती मिळाली होती. यावरुन या ठिकाणी जावुन पाहणी केली असता गांजाची शेती मिळुन आली, परंतु भावसिंग काशिराम पावरा हा पोलीस पथक छापा कारवाईसाठी आल्याचे समजल्यावरुन तेथुन पळुन गेला होता.
या छापा कारवाईत 76 लाख रुपये किमतीची गांजा वनस्पतीची हिरवी झाडे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत शिरपूर तालुका पोलीस ठाणे येथे पोहेकॉ सागर ठाकुर यांच्या फिर्यादीवरुन एन डी पी एस अॅक्ट कायदा कलम 8 (क), 20 (ब)ii (क) व 22 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोसई सुनिल वसावे हे करीत असुन दोन्ही आरोपीतांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे.