धरणाच्या कालव्याच्या दुरुस्‍तीसंदर्भात पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.  Pudhari Photo
धुळे

अक्कलपाडा धरणाच्या कालव्याची तत्‍काळ दुरुस्ती करा !

Dhule News | आमदार राम भदाणे यांच्या कार्यकारी अभियंत्यांना सूचना

पुढारी वृत्तसेवा

धुळे: शेतकऱ्यांची जीवन वाहिनी असलेल्या पांझरा नदीवरील नेर येथील शिवकालीन रायवट फड पाट कालवा व पाटचाऱ्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना अक्कलपाडा प्रकल्पातील पाण्याच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. यामुळे या फड पाट कालवा व पाटचाऱ्यांची त्वरित दुरुस्ती करावी, अशा सूचना धुळे ग्रामीण मतदारसंघाचे आमदार राम भदाणे यांनी दूरध्वनीद्वारे पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना केल्या. दरम्यान, याबाबत आमदार भदाणे यांच्या सूचनेनुसार नेरचे माजी सरपंच तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव खलाणे यांच्यासह शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नागेश वट्टे यांना या मागणीबाबत निवेदनही दिले.

पांझरा नदीवरील शिवकालीन रायवट फड कालवा व पाटचाऱ्यांमुळे नवे भदाणे, जुने भदाणे, नेर, लोणखेडी येथील शेती क्षेत्र ओलिताखाली येते. मात्र, अनेक वर्षांपासून त्यांची दुरवस्था झाली आहे. पाटकालव्यासह तसेच पाटचाऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होते. तसेच त्यांचे गेटही नादुरस्त झाले असून त्याद्वारेही मोठ्या प्रमाणात पाणी ‍वाया जाते. गेटच्या खिडक्याही पूर्णपणे तुटल्या आहेत. यामुळे अक्कलपाडा प्रकल्पात पाणी असूनही ते शेतकऱ्यांच्या शेतांपर्यंत पोहोचत नाही. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

पांझरा नदीवर शिवकालीन फड पाट कालवा व पाटचाऱ्या आहेत. ज्याद्वारे नेर, जुने भदाणे, नवे भदाणे, लोणखेडी येथील बहुतांश शेती ओलिताखाली येते. मात्र या पाटचाऱ्यांसह कालव्याची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाल्याने अक्कलपाडा प्रकल्पात मुबलक पाणी असूनही त्यापासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागत होते. याबाबत आम्ही आमदार राम भदाणे यांना निवेदन देऊन पाटचाऱ्यांच्या दुरुस्तीची मागणी केली होती. त्यांच्या सूचनेनुसार आम्ही पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, आमदार भदाणे यांनीही अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे चर्चा करत पुढील कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत. अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव खलाणे यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT