Rain Update Sakri
साक्री तालुक्यात पश्चिम पट्ट्यासह दमदार पाऊस  pudhari photo
धुळे

Rain Update Sakri | साक्री तालुक्यात पश्चिम पट्ट्यासह दमदार पाऊस ; मालनगाव धरण 'ओव्हरफ्लो'

पुढारी वृत्तसेवा

पिंपळनेर, जि.धुळे : साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील मालनगाव धरण संततधार पावसामुळे शंभर टक्के भरले आहे. धरण ओसंडून वाहण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी या भागात भेडसावणारी पाण्याची टंचाई काही अंशी संपुष्टात आली आहे.

आमळी भागात सकाळी साडेआठपर्यंत गेल्या 24 तासांत 116 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आजपर्यंत 552 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.यंदाच्या पावसाने एक दिवसात सर्वांत मोठ्या पावसाची नोंद शुक्रवारी सकाळी झाली. जून व जुलैच्या मध्यापर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत होता. गुरुवारी दुपारपासूनच पावसाचा जोर वाढला व रात्री उशिरा पावसाने रौद्ररूप धारण करून अतिमुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे परिसरातील घरांच्या छतांना मोठ्या प्रमाणावर गळती लागली. त्यामुळे आमळीकडे व पश्चिम भागात मुसळधार असलेला पाऊस दहिवेलच्या पूर्वेकडे काहीसा कमी झालेला आहे.शुक्रवारीही दिवसभर पावसाचा जोर कायम होता. परिसरात जुलैच्या दुसऱ्या आठवडाभरापासून पावसाचा जोर कायम असून,संततधार, तर कधी जोरदार सरी कोसळत आहेत.परिसरात प्रारंभीचे मृग नक्षत्र कोरडे गेले. मात्र आर्द्रा नक्षत्राच्या सुरवातीपासूनच पाऊस झाल्याने त्यात शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. त्यानंतर पुनर्वसू व पुष्य नक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावली.

आठवडा झाला सूर्यदर्शन नाही

गेल्या आठवडाभरापासून आमळीत पुरेसे सूर्यदर्शन झाले नाही. परिसरात पाऊस सक्रिय असून,सध्या दमदार होत आहे. मात्र सततच्या पावसामुळे कोळपणी,निंदणी, आंतरमशागतीची कामे फवारणी व पिकांना खताची मात्रा ही देता येत नसल्याने शेतीची कामे ठप्प आहेत. मात्र सध्या भात,नागली पुनर्लागवडीच्या कामांना मोठा वेग आला आहे. मालनगाव धरण ओव्हरफ्लो झाल्याने व कान नदीच्या उगमस्थानावर पावसाचा जोर कायम असल्याने कान नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्कता बाळगावी,असे आवाहन कार्यकारी अभियंता धुळे पाटबंधारे विभाग व उपविभागीय पाटबंधारे विभागाच्या वतीने कान नदीकाठी राहत असलेल्या शेतकरी, शेतमजूर व गुर- ढोरांसह नागरिकांसाठी केलेले आहे.तसेच सतकॅ राहण्याची सुचेना तहसील प्रशासनाने केली आहे.

कान नदीला पूर, मालनगाव मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो

परिसरात गेल्या आठवडाभरापासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे आणि गुरुवारी (ता.25)रात्री मुसळधार पाऊस झाल्यामुळे कान नदीवरील मालनगाव मध्यम प्रकल्प शुक्रवारी(ता.26) ओव्हरफ्लो झाला. या प्रकल्पाची क्षमता 400.12 दशलक्ष घनफूट आहे. गेल्या काही दिवसांपासून आमळी व कान नदीच्या उगमस्थानावर मुसळधार पाऊस झाल्याने या परिसराला अक्षरश:झोडपून काढले. कान नदीला पूर आला असून, शेतशिवारातील नाले दुथडी भरून वाहत आहेत. सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेच्या तुलनेत यंदा मालनगाव धरण तीन दिवस आधी भरले आहे.

SCROLL FOR NEXT