पिंपळनेर,जि.धुळे : साक्री तालुक्यातील मौजे वाघापूर येथे मेंढ्यांमध्ये पीपीआर आजाराचे लक्षणे आढळली आहेत. त्यावर उपाय म्हणून पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागातर्फे शिग्र कृती दल स्थापन करून बाधित क्षेत्रामध्ये लसीकरणाला सुरुवात करण्यात आलेली आहे.
वाघापूर येथे मेंढ्यामध्ये पीपीआर आजाराची लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे पशुसंवर्धन विभागातर्फे परिसरातील तब्बल 30 हजार मेढ्यांचे लसीकरण येत्या रविवार रोजी करण्यात येणार आहे.
परिसरातील उर्वरित मेंढ्यांचे लसीकरण येत्या रविवार (दि.29) रोजी पासून करण्यात येणार आहे. जिल्हा रोग नियंत्रण अधिकारी डॉ.अशोक वाडीले तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संदीप निकम, सहायक आयुक्त पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. योगेश गावित, पशुधन विकास अधिकारी डॉ. विशाल पवार हे लसीकरण मोहीमेत सहभागी होणार आहेत. तालुक्यातील सर्व मेंढपाळ यांनी आपल्या मेंढ्यांचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. लसीकरणासाठी एकूण सहा पथक तयार करण्यात आली असून सर्व पथक मिळून एकूण 40 अधिकारी व कर्मचारी हे युद्ध पातळीवर लसीकरणाची मोहीम राबवित आहेत. दरम्यान, मेंढ्यासोबतच इतर पशुधनाचीही यावेळी तपासणी करावी, अशी मागणी परिसरातील पशुपालकांनी केली आहे.
या रोगात प्रामुख्याने ताप आल्यावर शेळ्या मेंढ्यांना शिंका येतात.
नाकातून स्त्राव वाहतो.
डोळे लाल होऊन त्यातून घाण येते.
श्वास घेण्यास त्रास होतो.
जिभेवर व हिरड्यावर फोड येऊन चट्टे पडतात व तोंडाचा घाण वास येतो.
संडास पातळ होते.
वेळीच उपचार न झाल्यास नाकातील स्त्राव घट्ट होऊन तो पिवळसर होतो.
डोळ्यातील घाणीमुळे पापण्या बंद होतात व खाणे पिणे पूर्ण बंद होऊन अशक्तपणा वाढतो.
शेळ्या गाभण असतील तर गर्भपात देखील होतो पुढे जाऊन पाच ते सात दिवसात मृत्यू ओढवतो.
या विषाणूजन्य रोग असल्यामुळे उपचार करताना लक्षणानुसार उपचार करावे लागतात. जिवाणूंचे दुय्यम संक्रमण टाळण्यासाठी प्रतिजैवके व वेदनाशामक इंजेक्शन पशुवैद्यकांच्या सल्ल्याने द्यावेत.
तोंडातील जखमा १ टक्का पोटॅशियम परमॅग्नेटच्या सौम्य द्रावणाने धुवून घ्यावेत व बोरोग्लिसरीन लावावे.
या रोगात न्नवद टक्के पर्यंत मृत्यू आढळत असल्यामुळे लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. त्यासाठी जंत निर्मूलन करून घेऊन नंतर आठ ते चौदा दिवसांनी लसीकरण करून घ्यावे.
लसीकरण करून घेताना एकाच वेळी कळपातील सर्व शेळ्या मेंढ्यांचे लसीकरण करून घ्यावे. गोठा स्वच्छ व कोरडा ठेवावा.
गोठ्यात चुना पसरवून किंवा शिंपडून घ्यावा. सोबत ब जीवनसत्व व खनिज मिश्रणाचा पुरवठा करावा. मयत शेळ्या मेंढ्या या उघड्यावर न टाकता खोल खड्ड्यात पुरून घ्यावेत.