धुळे : मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात दारू बनवण्यासाठी लागणाऱ्या स्पिरिटची तस्करी करण्याचा प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आणला आहे. या प्रकरणात वाहना सह 245 लिटर रसायन जप्त करण्यात आले असून वाहन चालक-मालक आणि तस्करांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा पद्धतीने स्पिरिटची तस्करीची माहिती असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती द्यावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
शिरपूर तालुक्यातील हाडाखेड येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक एम.डी.पाटील हे मध्यप्रदेश राज्यालगत सीमावर्ती भागात गस्त घालीत असताना त्यांना गुप्त बातमी दारामार्फत रसायनाची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. एक महिंद्रा कंपनीचे बोलेरो पिक अप चार चाकी वाहन तिचा परिवहन क्रमांक( एमएच 01 सीआर 4469) मधून पळासनेर कडून शिरपुरच्या दिशेने अवैधरीत्या स्पिरिटची वाहतूक होणार आहे. अशी बातमी मिळाल्यावरून सांगवी शिवारात मुंबई आग्रा महामार्गावर एच.पी.पेट्रोलपंपा जवळ, संशयित वाहन आढळून आले या वाहनाची तपासणी केली असता
एकूण सात निळ्या रंगाचे प्लास्टीक ड्रम 35 लिटर क्षमतेचे पूर्ण पणे शुद्ध मद्यार्काने (स्पिरीट) भरलेले, आढळून आले . पथकाने 245 लि. वाहनासह 245 लिटर मद्यार्क असा 7,लाख 24,हजार 600रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र वाहन जवळ तस्करी करणारे कुणीही आढळून आले नसल्याची माहिती छापा मारणाऱ्या पथकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. यासंदर्भात वाहन चालक, मालक व इतर पाहिजे असलेले इसम फरार झाले असून यांचे विरुद्ध महाराष्ट्र दारु बंदी अधिनियमचे कलम ६५ (अ), (ई), ८०,८१,८३,९०,९८ (२) व १०८ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई दुय्यम निरीक्षक एम.डी. पाटील, दुय्यम निरीक्षक एस.एस. निकम, जवान गोरख पाटील, प्रशांत बोरसे, यांच्या पथकाने केली असून पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक श्रीमती. स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक एम.डी. पाटील, हे तपास करीत आहेत. अवैधमद्य निर्मिती, वाहतूक व विक्री संदर्भात कोणतीही माहिती अथवा तक्रार आल्यास या विभागाचा टोल फ्री क्र. 18002339999 व व्हाट्सअप नं 8422001133 तसेच दूरध्वनी क्र. 02562 297484 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.