धुळे : शिरपूर शहरात अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चानंतर रास्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण आले आहे. या गोंधळादरम्यान बंदोबस्तासाठी गेलेल्या शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांच्यावर अज्ञात व्यक्तीने तीक्ष्ण हत्याराने वार केला. त्यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले आहे.
शिरपूर तालुक्यातील सांगवी पोलीस ठाण्यात आठ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आदिवासी संघटनांच्या वतीने सोमवार (दि.18) आज शिरपूर शहरात मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या शेवटी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांना निवेदन देऊन आरोपीवर कठोर शासन करण्याची आणि खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी करण्यात आली. मोर्चा शांततेत पार पडला.
मात्र अर्ध्या तासानंतर शिरपूर येथील गुजराती कॉम्प्लेक्ससमोर काही तरुणांनी अचानक रास्ता रोको केला. त्यामुळे मोठी गर्दी जमल्याने वाहतूक खोळंबली. माहिती मिळताच निरीक्षक हिरे घटनास्थळी पोहोचले आणि आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला.
याप्रसंगी काही आंदोलक आक्रमक झाले. पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी सौम्य बळाचा वापर केला. दरम्यान गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने हिरे यांच्या पाठीमागून तीक्ष्ण हत्याराने वार केला. लगेचच त्यांना रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. सध्या त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले आहे.
रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांनी आरोपीला ताब्यात द्या आणि तत्काळ फाशी द्या अशा बेकायदेशीर मागण्या केल्या. आंदोलकांनी कायदा हातात घेतल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले असून, संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे.