धुळे पुढारी वृत्तसेवा- वंचित, मागास समाजाला शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी पीएम सूरज हे पोर्टल नव्याने सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले.
केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय महामंडळामार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे देशातील 1 लाख लाभार्थ्यांना सवलतीचे कर्ज वाटप तसेच पीएम सुरज पोर्टलचे उद्धाटन संपन्न झाले. त्यानिमित्ताने येथील राजर्षी शाहू महाराज नाट्यमंदीर, धुळे येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. कराड बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, जळगाव जिल्ह्याचे समाज कल्याणचे सहायक आयुक्त योगेश पाटील, धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे समाज कल्याणचे सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी महापौर प्रदीप कर्पे, चंद्रकांत सोनार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने 10 वर्षांत समाजातील सर्व घटकांचा विकास केला आहे. भारत सरकारच्या माध्यमातून वंचित आणि उपेक्षित गटातील लाभार्थ्यांसाठी विविध योजना राबविल्या आहे. त्यांच्या या कामामुळे देशामध्ये आमुलाग्र असा बदल झाला असून नागरीकांना आत्मनिर्भर आणि स्वंयपूर्ण होण्यासाठी मदत झाली आहे. या देशातील गरीब, वंचित घटकांचे शिक्षण, आरोग्य, राहणीमान सुधारण्याबरोबरच त्यांच्या उत्पनात वाढ होण्यासाठी विविध योजना प्रधानमंत्री यांच्या नेतृत्वाखाली सरकारने राबविल्या आहेत. या योजनांचा प्रत्यक्ष लाभ लाभार्थ्यांना मिळण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहे.
आज केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या विभागामार्फत पीएम सूरज या पोर्टलचे उद्धाटन प्रधानमंत्री नरेद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाले. या पोर्टलच्या माध्यामातून गोरगरीब, वंचितांनी अर्ज सादर केल्यावर त्यांना कर्ज मंजूर होईल. केंद्र शासनाने प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या माध्यमातून 10 हजारापासून ते 50 हजारापर्यंत कर्ज प्रकरणे मंजूर केले आहे. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री जनधन योजनेच्या माध्यमातून 54 कोटी नागरिकांचे खाते काढण्यात आले आहे. सुशिक्षित तरुणांना उद्योग व्यवसायासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून 50 हजारापासून ते 10 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेच्या माध्यामातून 2 लाख रुपयांचा गरीबांचा विमा काढण्यात आला आहे. तर आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 5 लाखापर्यंत विविध आजारांवर मोफत उपचार मिळणार आहे. भारतास 2047 पर्यंत विकसित राष्ट्र करण्याचा संकल्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे. भारतास विकसित राष्ट्र करण्यासाठी सामुदायिक प्रयत्न होणे आवश्यक असून गोरगरीबांपर्यत केंद्र व राज्य शासनाच्या योजना पोहचवून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ अंतर्गत राधिका उदीकर यांना 1 लाख 98 हजार, विजय पाटील 60 हजार, नंदु गवळी 2 लाख रुपयांचा प्रातिनिधीक स्वरुपात धनादेशाचे वाटप करण्यात आले. तसेच पठाण युनिसखान शरीफखान, वैभव सोना, अनिल मनोहर भगवान यांना प्रातिनिधीक स्वरुपात आयुष्यमान भारत कार्डचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन विकास साधलेल्या काही लाभार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधला. तसेच उपस्थितांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, वंचित व मागास घटकांचा विकास झाल्याशिवाय देश विकसित होणार नाही. त्यामुळे देशातील वंचित आणि मागास घटकांच्या विकासावर केंद्र सरकार भर देत असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वाहिद अली यांनी केले तर उपस्थितांचे आभार मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी मानले. कार्यक्रमास धुळे, जळगाव व नंदूरबार जिल्ह्यातील नागरीक, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.