पिंपळनेर,जि.धुळे : पिंपळनेर शहरातून जाणाऱ्या रस्त्याचे काम रखडल्याने अनेक दिवसांपासून विविध आंदोलने, उपोषणे होत होती. याअनुषंगाने न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार रस्त्याची अत्याधुनिक इलेक्ट्रिकल टोटल मशीन (ईटीएस) या पद्धतीने मोजणी भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून करण्यात आली. यासाठी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पिंपळनेर शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 जी या रस्त्याचे अवघ्या दीड किलोमीटरचे काम रखडले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना धुळीचा व खड्यांचा त्रास सहन करावा लागतो आहे. याविरोधात आजवर अनेकवेळा रास्ता रोको, उपोषणे करण्यात आली. प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन विविध पर्याय अवलंबण्यात आलेले होते. याची दखल घेत प्रशासनाने या रस्त्याची मोजणी रोवर यंत्राच्या साहाय्याने सुरू केली आहे. मंगळवार (दि.10) सकाळी दहा वाजेपासून पिंपळनेर शहरातून जाणाऱ्या या रस्त्याची मोजणी बसस्थानकाजवळील पांझरा नदी पुलापासून ते जेटी पॉइंट पर्यंत करण्यात आली.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सदर मोजणी करतेवेळी मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आलेला होता. यावेळी तहसीलदार साहेबराव सोनवणे, डीवायएसपी संजय बांबळे, किरण बर्गे आदींसह महसूल प्रशासनातील कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंकडील मोजणी होत असल्याने मोजणी कोणत्या नकाशाप्रमाणे, किती मीटर होत आहे,याची माहिती कळू शकली नाही. न्यायालयाच्या निर्देशानुसार मोजणी होत असून सदर मोजणी प्रक्रिया भूमी अभिलेख कार्यालयामार्फत होत असल्याची माहिती प्रशासनाकडून यावेळी देण्यात आली. दरम्यान,सदर रस्ता प्रकरणी गुरुवार, दि. 12 डिसेंबर रोजी मुंबई येथे बैठक होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले असून सदर बैठकीनंतर याबाबतचे पुढील तपशील कळू शकणार आहेत. सदर मोजणीनंतर रस्ता काँक्रीटचा होणार की डांबरीकरण याची उत्सुकता ग्रामस्थांमध्ये आहे. रस्ता मोजणी प्रक्रियेसाठी चार ते पाच तासांचा वेळ लागल्याने काही काळ वाहतूक एकविरा मंदिराजवळील बायपासने वळविण्यात आली होती.