पिंपळनेर (जि. धुळे) : साक्री तालुक्यातील पांझरा नदीवरील लाटीपाडा मध्यम प्रकल्पातून साक्री तालुक्यातील 23 गावांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी राखीव साठ्यातून 156.763 दलघफू पाणी सोडण्याचा आदेश जिल्हाधिकारी धुळे यांनी शुक्रवार (दि.25) रोजी दिला आहे, अशी माहिती आमदार मंजुळा गावित यांनी दिली.
त्या अनुषंगाने सोमवार (दि.28) रोजी लाटीपाडा धरणातून पहिले आवर्तन सोडले जाणार आहे. गावांमध्ये वाढती पाणीटंचाई लक्षात घेऊन आमदार गावित यांनी 1 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभाग, तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांना लेखी पत्र दिले होते.
माजी जिल्हा परिषद सदस्य गोकुळ परदेशी यांनी उजव्या कालव्यामधून पाणी सोडण्याची विनंती केली होती, तर शिवसेनेचे विशाल देसले यांनी काटवान परिसरातील गावांसाठी पाणी सोडण्याची मागणी केली. या आवर्तनामुळे साक्री तालुक्यातील उंभरे, उंभर्टी, मलांजन, शेणपूर, धाडणे, चिकसे, निवडणे, कोकळे, गोंदास, नांदवन, कासारे, मालपूर, शेवाळी, वाली, छाईल, प्रतापपूर, दिघावे, गणेशपूर, नाडसे, विटाई, दारखेल, बेहड, निळगव्हाण या गावांना आणि त्यांच्या पशुधनाला दिलासा मिळणार आहे. पिण्याच्या पाण्याच्या तातडीच्या गरजेकडे लक्ष वेधून घेतल्याबद्दल आमदार मंजुळा गावित यांनी जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले आहे.