पिंपळनेर (जि. धुळे): साक्री तालुक्यातील टिटाणे परिसरात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची दिवाळी अक्षरशः शेतीकामातच गेली. कापूस, मका आणि पशुधनासह जनावरांच्या चारापिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत. काही शेतांमधील उभे पीक पूर्णतः नष्टच झाले आहे.
पावसाने साक्री तालुका झोडपला: शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
दिवाळीच्या सणाच्या काळात शेतकरी आनंद साजरा करण्याऐवजी शेतातील पाण्याचा निचरा करण्यात आणि पिके वाचवण्याच्या प्रयत्नात गुंतले आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या घरात दिवाळीत दिवा लावायलाही पैसा नाही, अशी बिकट स्थिती निर्माण झाली आहे.
शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी अनेक ठिकाणी पंचनामे सुरूच झाले नाहीत. ज्या ठिकाणी झाले आहेत, तिथेही शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आणि नाराजी वाढली आहे.
घोषणा फक्त कागदावरच
शासनाच्या नुकसानीच्या भरपाईच्या घोषणा फक्त कागदावरच राहिल्या आहेत, अशी शेतकऱ्यांची नाराजी आहे. टिटाणे, खोरी आणि छडवेल परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तत्काळ सर्वेक्षण करून प्रति हेक्टर नुकसानभरपाई थेट खात्यात जमा करण्याची मागणी केली आहे.
हमीभावाची ऐशी की तैशी झाली आहे. मका आणि कपाशीचे दर हजार रुपयांनी कमी झाले आहेत. अवकाळी पावसाने संपूर्ण पिके नष्ट झाली आहेत आणि बळीराजाला शासन फक्त दिलासा देतंय; पण शेतकऱ्यांच्या हातात मात्र काहीच मिळत नाही.विजय बागुल, टिटाणे, ता. साक्री