Beer shop
बियर शॉपी file photo
धुळे

पिंपळनेर: बोपखेलला चोरट्यांनी बिअर शॉपी फोडत, लांबविली चार लाखांची बिअर

पुढारी वृत्तसेवा

पिंपळनेर,जि.धुळे : मद्याच्या नशेसाठी चोरट्यांनी चक्क तब्बल 4 लाखांची बिअर लांबविल्याचा प्रकार शुक्रवार (दि.२८) रोजी सकाळी उघडकीस आला. ज्या बिअर शॉपीमधून चोरट्यांनी बिअर लांबविली त्या बिअर शॉपीच्या मालकाने नुकताच गुरुवारी (दि. २७) रोजी बिअरचा साठा ठेवला होता. घटनेची माहिती कळताच पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस यांनी पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी जाऊन माहिती घेतली तर ठसे तज्ज्ञ व श्वान पथक धुळ्यातून साक्री तालुक्यातील बोपखेल गावी रवाना झाले आहेत.

पिंपळनेरपासून सुमारे 15 कि.मी अंतरावर असलेल्या बोपखेल गावात रंगराव धोंडू अहिरराव यांच्या मालकीचे प्रभात नावाचे बिअरशॉपी आहे. त्यांनी गुरुवारी (दि. २७) रोजी बिअरचा माल दुकानात भरला होता. मात्र रात्रीतून चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला व सुमारे चार लाख रूपये किमतीचा बिअरचा माल लंपास केला आहे. शुक्रवारी (दि. २८) रोजी सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर पिंपळनेर पोलिसांना कळविण्यात आले. माहिती मिळताच पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस, एपीआय विनोद खरात, एएसआय धनंजय मोरे, पोलीस कॉन्सटेबल प्रशांत माळीच, पोलीस हेड कॉन्सटेबल प्रकाश भावसार हे घटनास्थळावर दाखल झाले. यात ठसे तज्ज्ञांनी ठसे घेतले. तर श्वानाने काही अंतरापर्यंत चोरट्याचा माग काढला मात्र पुढे ते अयशस्वी ठरले. याप्रकरणी दुपारी उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. दरम्यान चोरट्यांनी बिअरचे बॉक्स चोरी करण्यासाठी वाहनाचा वापर केला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

SCROLL FOR NEXT