पिंपळनेर,जि.धुळे : राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री व आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कडुन मागील आमदारकीच्या कालावधीत 100 वर्षापूर्वीच्या ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रुपांतर करुन घेऊन पिंपळनेर नगरपरिषदेच्या प्रथम वर्धापन दिनाचे औचित्य साधुन स्वच्छ शहर व सुंदर शहर या अभियांनांतर्गत 6 घंटागाड्यांचे लोकार्पण करण्यात आले. यापूर्वी अग्निशमन वाहनाचे देखील लोकार्पण करण्यात आलेले आहे.
पिंपळनेर शहरातील रस्ते गटारी व विद्युत दिवे या विकास कामांसाठी 85 कोटी रुपयांचा निधी शासनाकडुन उपलब्ध करुन घेतला असुन विकासाच्या कामांना सुरुवात झालेली आहे. आपला परिसर स्वच्छ व सुंदर असावा यासाठी नागरिकांनी कचरा इतरत्र न टाकता आपल्या परिसरात येणाऱ्या घंटागाड्यांमध्येच टाकावा आणी आपले शहर स्वच्छ व दुर्गंधीमुक्त ठेवावे असे आवाहन आमदार मंजुळा गावित यांनी प्रथम वर्धापन दिनाच्या कार्यक्रमप्रसंगी केले.
पिंपळनेर नगरपरिषदेस एक वर्ष पूर्ण झाले असून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून पिंपळनेर शहरासाठी 6 घंटागाड्यांचे लोकार्पण सोहळा आयोजित केला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा शिवसेना प्रमुख डॉ. तुळशिराम गावित उपस्थित होते.
शहर स्वच्छ राखण्यासाठी सफाई कामगारांचे काम महत्वा असते. कमी पगारात शहर स्वच्छ ठेवण्यासाठी त्यांचा सहभाग असतो. असे डॉ.तुळशिराम गावित यांनी सांगुन सफाई कामगारांना सेफ्टी किट हे आमदार मंजुळा गावित यांचे हस्ते देण्यात आले. डॉ. तुळशीराम गावित यांनी सांगितले की, शहरासाठी शुध्द पाणीपुरवठा योजना लवकरच सुरु करण्यात येईल, शहराच्या विकास कामांची नागरिकांना समवेत घेऊन ब्ल्यू प्रिंट तयार करुन विकास कामे करण्यात येतील. शहरातुन वाहत असलेल्या पांझरा नदी काठाचे सुशोभिकरण करुन घन-कचरा व्यवस्थापनासाठी यंत्रणा उभारण्यात येईल. पिंपळनेर नगरपरिषदेच्या वर्धापन दिन साजरा करण्यासाठी आपण मोठया संख्येने उपस्थित राहिलात आपण या क्षणाचे साक्षीदार आहात पिंपळनेर शहराच्या मुख्य रस्त्याचे प्रश्न काही कारणाने प्रलंबित होता हा रस्ता पूर्ण व्हावा म्हणुन पिंपळनेर वासीयांची मागणी आहे. या कामाची वर्क ऑर्डर प्राप्त झालेली असून रस्त्याच्या कामात कोणी अडथळा व विरोध करीत असतील तर त्यासाठी एकजुटीने सामोरे जाऊ, हा रस्ता लवकरच पूर्ण करुन घेऊ. मुख्याधिकारी दिपक पाटील यांनी वर्षभरात नगरपरिषदेने केलेल्या कामांचा थोडक्यात आढावा घेतला.
वर्धापन दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी अपर तहसिलदार दत्तात्रय शेजुळ, सहायक पोलीस निरीक्षक किरण बर्गे, मुख्याधिकारी दिपक पाटील, ज्ञानेश्वर एखंडे, जि. प. सदस्य गोकुळ परदेशी, शिवसेना विधानसभा प्रमुख संभाजी अहिराव, तालुका प्रमुख अमोल सोनवणे, महिला आघाडीच्या संगिता पगारे, व्यापारी आघाडी शाम सेठ कोठावदे, प.स.सदस्य अजय सुर्यवंशी, बबलू चौधरी, विक्की भाऊ, जितु नांद्रे यांचेसह शहरातील मान्यवर नागरिक उपस्थित होते. संभाजी अहिराव यांनी आभार मानले. आकाश ढोले यांनी सुत्रसंचालन केले.