पिंपळनेर (जि. धुळे) : नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त सामोढे येथील साने गुरुजी प्राथमिक विद्यामंदिरात विद्यार्थ्यांसाठी प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल आवड निर्माण होऊन त्यांच्या उपस्थितीत वाढ व्हावी, यासाठी आकर्षक सजावट, औक्षण आणि मोफत पाठ्यपुस्तक वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव विनायक सिताराम देवरे उपस्थित होते. शाळापरिसरात रंगीबेरंगी फुगे, फलक, पुष्पगुच्छ आणि पारंपरिक पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना गोड खाऊ वाटून विविध खेळांचे आयोजन करून त्यांचे मनोरंजनही करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष हंसराज शिंदे, सचिव शरद शिंदे, साक्री तालुका शेतकरी संघाचे संचालक व सावित्रीबाई फुले संघाचे संचालक तसेच जयदया शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल शिंदे, प्रतिष्ठित नागरिक प्रदीप घरटे, भटू भारूड, आशा शिंदे, वाघ तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. मुख्याध्यापिका कविता भदाणे, शिक्षिका मनिषा भदाणे, ज्ञानेश्वर घरटे व कुणाल बेनुस्कर यांनी सूत्रसंचालन केले. मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षणार्थी कविता शिंदे व माधुरी घरटे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.