पिंपळनेर, जि.धुळे : येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा जयश्री पवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्याबाबत केलेल्या तक्रारीची विभागीय आयुक्त प्रविण गेडाम यांनी तत्काळ दखल घेतली. त्यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मुख्याधिकारी दीपक पाटील यांच्याकडून साक्री नगरपंचायतीचा अतिरीक्त कार्यभार काढून घेतला. तो शिंदखेडा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यानुसार फागणेकर यांनी मंगळवार (दि.8) रोजी अतिरिक्त पदभार स्विकारला आहे.
साक्री नगरपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार सांभाळतांना मुख्याधिकारी दीपक पाटील यांनी मनमानी कारभार तसेच निकृष्ट दर्जाची कामे केली. त्यांच्या बेकायदेशीर कामाची चौकशी करावी.तसेच त्यांच्याकडील साक्री नगरपंचायतीचा मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कारभार तात्काळ काढून घ्यावा.बेकायदेशीर कामांना तात्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी सोमवार (दि.7) काल साक्री नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा जयश्री पवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त प्रविण गेडाम यांच्याकडे केली होती. तसेच पाणी वितरणातील दुर्लक्ष, कामातील अनियमित्ता तसेच मुख्याधिकारी म्हणून नगरपंचायत कर्मचा-यांच्या बाबतीत प्रभावहीन कारभार, अशा तक्रारींचा पाढा यावेळी विभागीय आयुक्तांसमोर मांडण्यात आला.
या तक्रारीची विभागीय आयुक्त गेडाम यांनी तात्काळ दखल घेत धुळे जिल्हाधिकारी यांना पुढील कार्यवाहीचे आदेश दिले.त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मुख्याधिकारी दीपक पाटील यांच्याकडून साक्री नगरपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार काढून घेतला. तसेच साक्री नगरपंचायत मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार हा कालपासून शिंदखेडा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांच्याकडे प्रशासकीय कारणास्तर सोपविला आहे.तक्रारीची दखल घेतल्याबद्दल नगराध्यक्ष जयश्री पवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.