काबऱ्या खडक धरणाच्या पाणी सोडण्याच्या गेटमधून मोठ्या प्रमाणावर मातीचा भराव खचून पाणी गळती सुरू  (छाया:अंबादास बेनुस्कर )
धुळे

Pimpalner | काबऱ्याखडक धरणाच्या दुरुस्तीसाठी पाच कोटींच्या खर्चाची तरतूद; तरीही गळती

पुढारी वृत्तसेवा

पिंपळनेर,जि.धुळे : साक्री तालुक्यातील कान नदीवर काबऱ्या खडक धरणाच्या पाणी सोडण्याच्या गेटमधून मोठ्या प्रमाणावर मातीचा भराव खचून पाणी गळती सुरू झाली. धरण फुटणार असा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि पूर्वेकडील कान नदी जवळील काठावरील शेतकरी ग्रामस्थ व नागरिकांमध्ये दिवसभर भीतीचे वातावरण निर्माण झाले.

काबऱ्या खडक धरणाच्या क्षेत्रात गेल्या आठवड्याभरापासून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यातच पिंपळनेरसह परिसरात मुसळधार पाऊस झाला. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले. तत्काळ याची दखल घेत काबऱ्या खडक प्रकल्पाच्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी जळगाव पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता श्रीकांत दळवी, कार्यकारी अभियंता नागेश वटे, उपविभागीय अधिकारी बांगर यांनी प्रकल्पाची पाहणी केली. पाणी गळती होत असलेल्या ठिकाणी तत्काळ मातीचा भराव टाकून गळती होत असलेले पाणी थांबविण्यात आले आहे. उर्वरित दुरुस्तीचे काम अधिक मशनरी वाढवून काम दर्जेदार व्हावे अशी सूचना दळवी यांनी ठेकेदार यशवंत खांडेकर यांना दिली आहे.

काबऱ्या खडक धरणाच्या पाणी सोडण्याच्या गेटमधून मोठ्या प्रमाणावर मातीचा भराव खचून पाणी गळती सुरू

दरम्यान काबऱ्या खडक प्रकल्पाचे काम 2000 मध्ये पूर्ण झाले असून, या प्रकल्पाची क्षमता 110 दशलक्ष घन फूट आहे. लांबी 580 मीटर, उंची 22 मीटर आहे. 2018-19 या वर्षी झालेल्या पावसाळ्यात या प्रकल्पाच्या मातीच्या बंधाऱ्याच्या भरावातून मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली तर काही ठिकाणी भराव खचला होता. यात धरणाला धोका होऊ नये म्हणून तत्कालीन अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र प्राधिकरण जळगाव यांच्या सूचनेनुसार 2021 च्या पावसाळ्यापूर्वी या प्रकल्पाचा सांडवा तोडण्यात आला. प्रकल्प दुरुस्तीसाठी मान्यता घेत चार कोटी 88 लाख 2 हजार 768 रुपयाच्या निधीची तरतूद केली. त्यानंतर प्रकल्पाचे काम नोव्हेंबर 2023 मध्ये सुरू करण्यात आले. सध्या प्रकल्पात 40 टक्के पाण्याचा साठा असून सांडवाही आधीच तोडलेला आहे, असे दळवी यांनी नागरिकांना सांगितले. प्रकल्प स्थळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भानुदास गांगुर्डे यांनी खासदार गोवाल पाडवी यांच्याशी पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनी द्वारे चर्चा करून माहिती दिली. अधिकाऱ्यांनी प्रकल्पाचे काम लवकर व गुणवत्ता पूर्ण करण्याचे मान्य केले. यावेळी पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता से. नि. के. टी.सूर्यवंशी, राहुल नेमाने, किरण दहिते, धर्मेंद्र बोरसे, नथू चौरे, सरपंच राजू जगताप, पि. के. पाटील, जितेंद्र बागुल, मिलिंद बागुल परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT