पिंपळनेर (जि.धुळे) : साक्री तालुक्यातील दिघावे परिमंडळातील वनकर्मचाऱ्यांनी गस्त दरम्यान शेलबारी फॉरेस्ट कंपार्टमेंट क्र. 221 मध्ये विनापरवाना मुरूम उत्खनन करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले आहे. पोपट सुक्राम पवार (शेतकरी), कुंदन रमेश चौरे (ट्रॅक्टर चालक) व लखन बांजी साव (जेसीबी चालक) हे जेसीबीच्या सहाय्याने जंगल क्षेत्रात उत्खनन करताना आढळले.
या प्रकरणी वनरक्षक दिघावे यांनी भारतीय वन अधिनियम 1927 अंतर्गत कलम 26 (1) ड, ग व 52 नुसार वनगुन्हा (P.O.R. 03/2025) नोंदवून अंदाजे 25 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल – जेसीबी व ट्रॅक्टर ट्रॉलीसह – जप्त करण्यात आला आहे. हा मुद्देमाल पिंपळनेर वनपरिक्षेत्र कार्यालयात आणण्यात आला आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी ओंकार ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल आर. व्ही. चौरे, वनरक्षक अनिल एम. घरटे, दीपक राठोड, सविता ठाकरे तसेच वनमजूर बाजीराव पवार, ऊजेंद्र चौधरी आणि बबलू कुवर यांनी ही कारवाई केली. वनपाल आर. व्ही. चौरे हे पुढील तपास करीत आहेत.