पिंपळनेर,जि.धुळे : धुळे येथील बिरारी परिवाराने आपल्या मुलाचा सत्यशोधक पद्धतीने विवाह करून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याला खऱ्याअर्थाने उजाळा देत समाजात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी समाज परिवर्तनासाठी आपले आयुष्य वेचले. आजची सुशिक्षित पिढी प्री-वेडिंग शूटिंगच्या नावाने संस्कृतीला फाटा देत पाश्चिमात्य संस्कृतीमधील नाविन्याची कास धरत आहे. मात्र, त्यामुळे नको अशा प्रथांना वाट मिळत आहे. परिणामी वधु-वर यांच्या माता पित्यांना नकाेसा झालेला असा आर्थिक खर्चाचा डोंगर पेलावा लागत आहे.
धुळे येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदार व कामगार नेते आप्पासाहेब बी. एन. बिरारी व त्यांची पत्नी संध्या बिरारी यांचा चिरंजीव सागर व संतोष राजधर माळी व हिराबाई माळी (रा.पोहरे ता.चाळीसगांव,ह.मु.धुळे) यांची सुकन्या भाग्यश्री यांचा या सर्व घातक रूढी परंपरेला फाटा देत महाजन हायस्कूलच्या प्रांगणात पुरोहिताविना "सत्यशोधक"पद्धतीने विवाह संपन्न होत त्यांनी समाजात एक आदर्श निर्माण केला आहे.
यावेळी विवाह मंचावर छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे भव्य प्रतिमांचे पूजन वर व वधू व त्यांचे माता पित्याने पूजन करून पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर खंडोबाची तळी भरून भंडारा उडवत 'येळकोट येळकोट जय मल्हार' जयघोष करण्यात आला. सत्य धर्माच्या अखंडाचे वाचन करण्यात आले. त्यानंतर वर-वधूंनी एकमेकांना जीवनभर साथ देण्याची तसेच निर्व्यसनी राहून कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्याची व सत्यशोधक विचार आचरणात आणण्याची शपथ घेतली. त्यानंतर तात्यासाहेब महात्मा फुले लिखित सत्यशोधक मंगलाष्टक म्हणून पुरोहिता शिवाय हा शुभमंगल विवाह मोठ्या उत्साहात संपन्न झाला. खऱ्या अर्थाने महात्मा फुले यांचे विचार आचरणात आणून बिरारी परिवाराने समाजात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
या विवाहास सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, कृषी, शैक्षणिक व महसूल विभागातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून विवाहाचे कौतुक करत वधूवरांसह त्यांच्या माता-पित्यांचे अभिनंदन केले. वधूवरांना सत्यशोधक विधी करतेवेळी सुभाष जगताप, भगवान रोकडे, राजकिशोर तायडे, लोकक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष देवेंद्र पाटील, शिवसेनेचे माजी आमदार प्रा.शरद पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित, शिवसेना माजी प्रमुख हिलाल अण्णा माळी, हनुमंत वाडीले, उद्यान पंडित विलास माळी, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रा.सुरेश चौधरी, बापू खलाणे, अ.भा.माळी महासंघाचे अध्यक्ष विलास माळी यांच्यासह अनेक मान्यवरांनी कौतुक केले.