पिंपळनेर (जि. धुळे) : गुढीपाडवा समितीतर्फे सुभाषचंद्र बोस चौकात गावगुढी उभारून तसेच शहरातील सर्व मंदिरांमध्ये दीपप्रज्वलन करून हिंदू नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. या सोहळ्यात शहरातील मान्यवर, समिती सदस्य आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होते.
गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला समितीच्या कार्यालयात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि भगवान श्रीराम यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. गुढी उभारणीच्या कार्यक्रमात युवा संघर्ष मित्र मंडळ, वाणी समाज, नाभिक, धोबी, तैलीक समाज आणि इतर नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
गुढीपाडवा हा वसुधैव कुटुंबकम आणि अखिल मानव समाजाच्या मंगलतेचे प्रतीक मानला जातो. पिंपळनेर पंचक्रोशीत समाज विकासासाठी समर्पित काही तरुण गेल्या 27 वर्षांपासून गुढीपाडवा समितीच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत. समितीच्या वतीने विविध विधायक उपक्रम राबवले जातात. हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी मंदिरांवर भगवे ध्वज फडकवण्यात आले, दीपप्रज्वलन करणे, नवजात कन्यारत्न व त्यांच्या मातांचा सन्मान करणे, स्वच्छता अभियान, भूकंपग्रस्तांसाठी निधी संकलन तसेच मंदिरातील खंडित मूर्तींचे विधिवत विसर्जन हे उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत.
विशेष म्हणजे, गावातील अंत्यविधी व्यवस्थेतील अडचणी लक्षात घेऊन समितीने विनाशुल्क 'वैकुंठ रथ' सेवा उपलब्ध करून दिली आहे. समितीचे वैशिष्ट्य म्हणजे येथे कोणताही अध्यक्ष किंवा पदाधिकारी नाही. सर्व सदस्य समान असून राष्ट्र, धर्म आणि समाजासाठी नि:स्वार्थ सेवा देण्याच्या भावनेने कार्यरत आहेत. त्यामुळे गुढीपाडवा समिती हा परिसरातील समाजसेवेचा एक आदर्श स्तंभ ठरला आहे.