पिंपळनेर,जि.धुळे : राष्ट्रीय सेवा योजना ही स्वयंसेवकांमध्ये दडलेल्या सुप्त गुणांचा विकास करून, देशासाठी सक्षम पिढी उभी करणारी कार्यशाळा आहे. स्वयंसेवकांनी हिवाळी शिबिरास आलेला पहिला दिवस आणि समारोपप्रसंगी घरी परतताना गेल्या सात दिवसातील आपल्यात झालेल्या बदलांचे आत्मपरीक्षण करावे. हे बदल म्हणजेच भावी आयुष्यात सक्षमपणे, सकारात्मक दृष्टीने, सहकार्य भावनेने जगण्याची शिदोरी असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीयसेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा.डॉ.हेमंत पाटील यांनी केले.
पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीच्या कर्मवीर आ.मा. पाटील आणि एन.के.पाटील महाविद्यालयाच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर समारोप प्रसंगी प्रा.डॉ.पाटील बोलत होते. समारोप प्रसंगी अध्यक्षस्थानी कॉलेज कमिटीचे चेअरमन धनराज जैन, संस्थेचे ज्येष्ठ संचालक सुभाष जैन, डॉ.विवेकानंद शिंदे, प्राचार्य डॉ.एल.बी.पवार, आश्रम शाळेचे प्राचार्य पी.बी. पवार, कार्यक्रम अधिकारी प्रा. एल.जे.गवळी, सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. संजय तोरवणे, प्रा. डॉ.एन.बी.सोनवणे, एन.एस. कुवर उपस्थित होते. पंढरीनाथ कोठावदे, धनराज सेठ जैन यांनी मनोगत व्यक्त केले.
प्राचार्य डॉ. एल.बी.पवार यांनी प्रास्ताविक करत कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. गेल्या सात दिवसीय निवासी शिबिराचा अहवाल वाचन प्रा.एल.जे. गवळी यांनी केले. स्वयंसेवक यज्ञश्री धायबर,सलोनी गांगुर्डे, पल्लवी गांगुर्डे यांनी शिबिरात आलेल्या अनुभवाचे कथन केले. चेतना निकुम यांनी सूत्रसंचालन केले. पल्लवी बोरसे यांनी आभार मानले. दत्तक गाव शेवगे येथील आदिवासी शासकीय आश्रमशाळेत सदर शिबिर झाले. यात विविध कार्यक्रम घेतले गेले.