पिंपळनेर, जि. धुळे : मलांजन गावालगत पांझरा नदीवर सुमारे 1.75 कोटी रुपये खर्चाच्या साठवण बंधाऱ्याचे भूमिपूजन आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते झाले.
आमदार गावित म्हणाल्या की, साक्री तालुक्यातील अधिकाधिक शेती क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी मृदा व जलसंधारण विभागामार्फत एकूण 47 साठवण बंधाऱ्यांची योजना मंजूर करण्यात आली. यामध्ये सुरुवातीला 33 आणि नंतर 14 साठवण बंधाऱ्यांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, उर्वरित बंधाऱ्यांचे भूमिपूजन लवकरच करण्यात येणार आहे.
योजनेंतर्गत पांझरा-बुराई नदी, घोटी नदी तसेच दरेगाव, ढोलीपाडा, नवापाडा, शेवगे-कोकणगाव, बोडकीखडी, लगडवळ, पारगाव, रुणमळी, डांगशिरवाडे आदी ठिकाणीही बंधाऱ्यांची कामे सुरू आहेत. मलांजन साठवण बंधाऱ्याचे कार्यारंभ आदेश सप्टेंबर 2024 मध्ये निघाले होते आणि आता प्रत्यक्ष कामाची सुरूवात झाली आहे.
बंधाऱ्याची लांबी 130 मीटर आणि उंची 3.35 मीटर असून, यात 3.48 दशलक्ष घनफूट पाणी साठवले जाणार आहे. हे पाणी 55 हेक्टर क्षेत्राच्या कृषी सिंचनासाठी उपयुक्त ठरणार असून 18 गेट्स असलेल्या या बंधाऱ्याचे बांधकाम 1 कोटी 75 लाख रुपयांमध्ये करण्यात येणार आहे. या बंधाऱ्यामुळे केवळ सिंचनच नव्हे तर पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सुटणार आहे. कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य गोकुळ परदेशी, साहेबराव गांगुर्डे, विनायक अकलाडे, पंकज मराठे, राहुल भोसले, बंडू नांद्रे, अजय सोनवणे, जितेंद्र बिरारीस, जितू नांद्रे, योगेश अहिरराव, सोनवणे, अभय शिंदे, हृषीकेश मराठे, ऋतुराज ठाकरे, अक्षय सोनवणे, पप्पू ठाकरे, पंकज भामरे आदी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.