पिंपळनेर,जि.धुळे : साक्री तालुक्यातील दुसाणे येथे 33 केव्हीचे वीज उपकेंद्र आहे. इंदवे, हट्टी, बळसाणे, ऐचाळे, बोकडबड्या असे एकूण पाच फिडर जंगल व बळसाणे, ऐचाळे, हाट्टी असे तीन फिडर गावठाण असे एकूण 8 फिडर आहेत. सहा फिडर दिवसा व दोन फिडर रात्रपाळीत आहेत. तसेच उपकेंद्रातील 5 एमव्हीचे 3 ट्रान्सफार्मर असून, त्यात एक ट्रान्सफार्मर ऑइल लिकेजमुळे नादुरुस्त झालेला आहे. याचा परिणाम सलग आठ फिडरांवर होताना दिसून येत आहे.
पूर्ण विजेचा भार दोन ट्रान्सफार्मरवर आल्याने जंगल फिडर सुरू केल्यास गावठाण फिडर बंद करावे लागत आहेत. त्यामुळे गावात वीज किती तास बंद राहील, याबाबत कर्मचारीही अनभिज्ञ असतात. आश्चर्याची बाब म्हणजे 10 एमव्हीचा मोठा ट्रान्सफार्मर उपकेंद्रात धूळखात पडलेला असून, तो बसवण्यासाठी अजूनही मुहूर्त महावितरणाला सापडत नाही. हा ट्रान्सफार्मर बसवल्यास मोठा विद्युत भार विभागला जाऊन वीजपुरवठा सुरळीत होऊ शकतो. वितरण कंपनी मात्र खंडित वीजपुरवठ्याबाबत मौन बाळगून आहे.
कुठलीही सकारात्मक कार्यवाही याबाबत केली जात नाही. सर्वच परिसरात शेती पंपांना अनियमित वीजपुरवठा केला जात असून, ग्रामस्थ व शेतकरी वैतागले आहेत. विजेच्या लपंडावामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून, वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही परिस्थिती न सुधारल्यास शेतकऱ्यांचा संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. गावठाणसाठी किमान 20 तास तर शेतीसाठी 8 तास वीजपुरवठा करण्याची तरतूद आहे. परंतु निर्धारित वेळेत सुरळीत वीजपुरवठा होत नाही. मध्येच वीज कंपनीचे कर्मचारी अधिकारी तांत्रिक काम हाती घेऊन वीजपुरवठा बंद करतात. तसेच 33 केव्ही उपकेंद्राला वरून फक्त 28 केव्हीचा वीजपुरवठा होतो आहे. परिणामी, पूर्ण दाबाने वीज मिळत नाही. यामुळे केळी बागांसह कांदा, गहू, हरभरा ही रब्बी पिके धोक्यात आली आहेत. शेतकऱ्यांना पाणी देणे अशक्य असल्याने शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीज मिळावी, अशी मागणी इंदवे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी केली आहे विजपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.