(छाया,:अंबादास बेनुस्कर)
(छाया,:अंबादास बेनुस्कर)
धुळे

पिंपळनेर : कोंडाईबारी वनक्षेत्रातील अतिक्रमण हटविले;16 जणांविरोधात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

पिंपळनेर,जि.धुळे : साक्री तालुक्यातील कोंडाईबारी वन क्षेत्रातील जांभोरामधील वन जमिनीवर वृक्षतोड करून अनधिकृतपणे अतिक्रमण करण्यात आले होते. वन विभागाने पोलिस बंदोबस्तात मोहीम राबवून सुमारे 20 हेक्टरवरील अतिक्रमण हटवून वनजमीन अतिक्रमणमुक्त केले आहे.

धुळे वन विभागातील कोंडाईबारी वन क्षेत्रातील नियत क्षेत्र जांभोरा येथील कक्ष क्रमांक 365, 366 मध्ये राखीव वन जागेत काही जणांनी जानेवारी ते मे महिन्यादरम्यान शेतीसाठी अतिक्रमण करण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात वृक्षतोड व साफसफाई केली होती. याप्रकरणी 16 अतिक्रमणधारकांविरुद्ध वन गुन्हे नोंदविण्यात आले होते. त्यानंतर संबंधितांकडून पावसाळ्यात राखीव वनात साफसफाई केलेल्या क्षेत्रात शेती करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता.

बैठकीत घेण्यात आलेला निर्णय

याबाबत वन विभाग, महसूल व पोलिस अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन अतिक्रमण करणाऱ्यांना समज देण्यात आली होती मात्र तरीदेखील संबंधीतांनी जाणीवपूर्वक साफसफाई केलेल्या जागेवर शेती तयार करून पेरणी केली. त्याअनुषंगाने वन विभागातर्फे चोख पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत 14 पोकलैंड व जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमित क्षेत्रात समतल चर करून 20 हेक्टर वन जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आलेली आहे.

वनसंरक्षक नौनू सोमराज, जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून दिला. कारवाईच्या ठिकाणी धुळे वन विभागाचे उपवनसंरक्षक नितीनकुमार सिंह, विभागीय वन अधिकारी आर.आर, सदगीर, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय बांबळे, पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड, धुळे वन विभागाचे वन क्षेत्रपाल, महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

वनजमिनीवर अतिक्रमण करून नंतर वनहक्क पट्टे मिळती हा गैरसमज आहे. परंतु वनहक्क कायद्यानुसार १३ डिसेंबर २००५ पूर्वीचे अतिक्रमणधारकानांच वनहक्क मान्य करण्यात येतात. त्यानंतरच्या अतिक्रमणधारकांसाठी वनहक्क कायदा लागू नाही. वनजमिनीवर अतिक्रमण करणे हा भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ अन्वये गुन्हा आहे. हा गुन्हा अजामीनपात्र आहे. वन जमिनीवर अतिक्रमण केल्यास संबंधितास अटक होऊन एक वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते. त्यामुळे कोणीही वन जमिनीवर अतिक्रमण करू नये.
नितीनकुमार सिंह, उपवनसंरक्षक, धुळे
SCROLL FOR NEXT