पिंपळनेर,जि.धुळे : येथील रुहाणी विश्व मानव केंद्राच्या जागेवर मल्याचा पाडा येथील नागरिकांनी केलेले अतिक्रमण जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्या न्यायालयीन आदेशावरून जनरल मुख्त्यार किशोर अहिरराव यांचे गट नं.51 मधील अतिक्रमीत क्षेत्राचा कब्जा हा पोलिस बंदोबस्तात अप्पर तहसीलदार दत्तात्रय शेजुळ व उपअधीक्षक भूमापन अभिलेख एस.टी.जाधव यांच्या उपस्थितीत नकाशाप्रमाणे जागा ताब्यात घेण्यात आली आहे. त्यानंतर येथील जागेला तार कंपाऊंड करण्यात आलेले आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 138 अन्वये अतिक्रमण अर्ज निकालाचे सूचनापत्र आदेशानुसार निकाली काढण्यात आल्यानंतर मंगळवार (दि.२३) रोजी जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्या न्यायालयातील कामकाज क्र.आरटीएस अतिक्रमण अर्ज 87/2022 (मल्याचा पाडा) निकाली काढण्यात आला आहे.
अतिक्रमण काढताना पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अपर तहसीलदार दत्तात्रय शेजुळ व उप अधिक्षक भूमापन अभिलेख एस.टी.जाधव तसेच महसूलचे कर्मचारी यांनी पोलिस बंदोबस्त तैनात ठेऊन मानव केंद्राची असलेली जागा गट क्र.51 मोजणी करून तिला तार कंपाऊंड केले आहे. तसेच या ठिकाणी कोणी अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा बोर्ड देखील लावण्यात आला आहे. दरम्यान मंगळवार (दि.२३) रोजी मल्याचापाडा येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस यांच्या नेतृत्वाखाली दिवसभर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थ व प्रशासन यांच्यात शाब्दिक वाद झाला असून कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. नोव्हेंबर 2020 मध्ये विश्व मानव केंद्राकडून जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केल्याने हा संघर्ष अद्याप देखील सुरू आहे.
या निर्णयाविरुध्द पुंडलिक चिंधा गांगुर्डे, बापू उमा गांगुर्डे, मोतीराम पावजी गांगुर्डे सर्व (रा. मल्याचा पाडा, पिंपळनेर) यांना अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे आदेश प्राप्त झाल्यापासून 60 दिवसांचे आत दाद मागता येणार आहे.