पिंपळनेर,जि.धुळे : साक्री तालुक्यातील आयने गावात घराच्या जागेवरून चौघांनी इसमास बेदम मारहाण केली. या मारहाणीत एकाने कुऱ्हाडीने हल्ला केल्याने इसम गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली आहे.
नंदु वसंत मोरे (34 ,रा. आयने, ता.साक्री) या इसमाने दिलेल्या फिर्यादीनुसार,रात्री 9 वाजेच्या सुमारास घरी असतांना योगेश विजय सोनवणे, विजय वामन सोनवणे, लताबाई विजय सोनवणे, निकुबाई विजय सोनवणे (सर्व रा.आयने,ता.साक्री) यांनी घराच्या जागेवरून वाद घालण्यास सुरूवात केली. योगेश सोनवणे याने दमदाटी करीत घर बांधण्यास विरोध केला. त्यावर ही जागा मी विकत घेतली आहे, असे सांगितले. याचा राग आल्याने चौघांनी शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. योगेश सोनवणे याने कुऱ्हाडीने डोक्यावर वार केला. यामध्ये डोक्यावर गंभीर जखम झाल्योन ते खाली कोसळले. फिर्यादीवरून निजामपूर पोलीस ठाण्यात चौघा संशयितांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक मयुर भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्सटेबल मोरे पुढील तपास करीत आहेत.