पिंपळनेर,जि.धुळे : दिल्लीतील राष्ट्रपती भवनात सोमवारी (दि.28) रोजी सायंकाळी साक्री तालुक्यातील बारीपाडा येथील चैत्राम देवचंद पवार यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.
चैत्राम पवार यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पुरस्कार घोषित झाला. पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यांनी सन 1990 च्या दशकात संयुक्त वन व्यवस्थापन प्रभावीपणे राबवले होते. त्यांनी केलेल्या कार्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरातमधील अनेक गावांचे जीवनमान उंचावले. शिवाय पर्यावरणाचे संवर्धन झाले. त्यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार मिळाला असून धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दुर्गम बारीपाड्याची स्थिती त्यांच्या कार्यामुळे बदलली आहे. याप्रसंगी पुरस्कार वितरण स्थळी दिल्ली येथे बारिपाडासह परिसरातील ग्रामस्थही हजर होते.