पिंपळनेर,जि.धुळे : बांगलादेशीय अल्पसंख्यांक हिंदूवर सुरू असलेल्या अमानवीय अत्याचाराविरोधात मंगळवार (दि.10) रोजी शहरात समस्त हिंदू समाजातर्फे मोर्चा काढण्यात आला. यामध्ये समाजबांधव प्रचंड संख्येने सहभागी झाले होते. शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नावे असलेले मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले. अत्याचारामुळे बांगलादेशीय हिंदू समूदाय त्रस्त असून हिंदूचे धार्मिक स्वातंत्र्य देखील धोक्यात आहे. याकडे बांगलादेश शासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. त्यामुळे बांगलादेशीय हिंदूंच्या मानवाधिकार, मालमत्ता आणि जिवाचे संरक्षण करावे अशी मागणी निवदेनाद्वारे करण्यात आली.
पिंपळनेर शहरातील गांधी चौकात सामुहिकपणे एकत्र येऊन तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यासाठी हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बांगलादेशाविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर नायब तहसीलदार नाशिककर यांना भागवताचार्य मकरंदजी वैद्य, श्रीराम मंदिराचे सर्वेश्वरदास महाराज, विठ्ठल मंदिर संस्थानचे योगेश्वर महाराज देशपांडे, हभप विजय महाराज काळे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.