पिंपळनेर (जि. धुळे) : साक्री शिवारातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर झालेल्या भीषण अपघातप्रकरणी आयशर ट्रकचालकाला सहा महिने सक्तमजुरी आणि 19 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
कौतुक फकीरा गवळी (रा. भामेर, ता. साक्री) हा आयशर (क्र. एमएच 18 एम 4489) ट्रक भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवत असताना, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, रस्त्यावर नादुरुस्त स्थितीत इंडिकेटर सुरू असलेल्या कंटेनर (क्र. एनएल 02 के 9517) ला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रकमधील गोरख झिपा वाघ यांचा मृत्यू झाला, तर शिवराम जगन गवळे, किरण पाटील, विजय वाघ व कंटेनर चालक विकास पांडे (रा. कोलकाता) हे गंभीर जखमी झाले. ही घटना दि. 23 नोव्हेंबर 2013 रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली होती.
अपघातानंतर चालक कौतुक गवळी हा घटनास्थळावरून फरार झाला. त्याच्याविरुद्ध साक्री पोलिस ठाण्यात मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याने वाहनाचे कागदपत्रे बाळगले नव्हते, वाहन विम्याशिवाय होते आणि अपघाताची माहितीही न देता तो फरार झाला होता. या प्रकरणी सहायक सरकारी वकील चेतन वळवी यांनी अंतिम युक्तिवाद केला. खटल्यातील साक्षीदारांची चौकशी विशेष सरकारी वकील अॅड. अतुल जाधव यांनी केली. त्यांना संजय मुरक्या (सहा. संचालक व सरकारी अभियोक्ता, धुळे) यांचे मार्गदर्शन लाभले. गुन्ह्याचा तपास एपीआय एस.एन. भगत यांनी केला, तर पैरवी अधिकारी म्हणून सादिक सय्यद यांनी काम पाहिले.