पिंपळनेर,जि.धुळे: साक्री तालुक्यात सध्या सर्रास सुरू असलेल्या अवैध वृक्षतोडीच्या निषेधार्थ तालुक्यातल्या काटवान भागातील पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते ॲड. युवराज तोरवणे, साक्री तालुका मराठी पत्रकार संघ, साक्री तालुका निसर्ग मित्र समिती, मनसे व भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने आंदोलन करत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. वन विभाग व राज्य मार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची वरील निवेदनकर्त्यांसोबत त्वरित बैठक घेण्याची मागणी करण्यात आली.
तालुक्यात सर्रास व दररोज वृक्षांच्या होणाऱ्या कत्तलीमुळे तालुका उजाड होत असून याचे गंभीर परिणाम तालुका आज भोगत आहे. याबाबत गेल्या महिन्यापासून आपण संबंधित अधिकाऱ्यांकडे ई-मेलद्वारा पत्रव्यवहार करूनही दखल घेतली जात नसल्याची खंत तहसीलदार साहेबराव सोनवणे यांच्याकडे ॲड. युवराज तोरवणे यांनी व्यक्त केली. तालुक्याचे पालक व माणुसकीच्या नात्याने यात लक्ष घालण्याची विनंती त्यांनी तहसीलदारांना केली.
वृक्षतोडीत सहभागी वन विभागातील कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सर्व तपासणी नाक्यांवर कर्मचारी तैनात ठेवावेत. राहुड घाटात तपासणी नाका सुरू करावा. या मार्गाने अवैध वृक्षतोड करून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याचे अनेकवेळा दिसून येत असल्याने तपासणी नाक्याची आवश्यकता आहे.
वृक्षतोड करणाऱ्यांची गुप्तपणे माहिती देणाऱ्या तरुणांचे जाळे तयार करावे, प्रशासनास याकामी सहकार्य करावे अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. शिवाय हा प्रश्न त्वरित मार्गी लागला नाही तर आंदोलनाची कार्यवाही केली जाईल. याप्रसंगी पर्यावरणमंत्र्यांची भेट घेऊन व ठिय्या आंदोलनादी पवित्रा घेतला जाईल, असेही निवेदनातून सांगण्यात आले आहे. याप्रसंगी ॲड. युवराज तोरवणे, प्राचार्य बी.एम. भामरे, प्रा.नरेंद्र तोरवणे, विजय भोसले, संजय बच्छाव, दिनेश बोरसे, मनसेचे धीरज देसले, अनिल देसले, अंबादास बेनुस्कर, अमृत सोनवणे, शैलेश गादेकर, बाबुद्दीन शाह, महेंद्र चंदेल, नीलेश तोरवणे, शरद तोरवणे, शहाजी तोरवणे, अजित सुरी, समसू पिंजारी आदी उपस्थित होते.