पिंपळनेर,जि.धुळे : तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने साक्री येथे जिल्हास्तरीय पंडित दिनदयाळ उपाध्याय जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे सोमवार (दि.24) रोजी सकाळी 10 वा राजे लॉन्स साक्री आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ.तुळशिराम गावित, भाजपा उपजिल्हाध्यक्ष चंद्रजित भामरे, प्रांत रोहन कुवर, तहसिलदार साहेबराव सोनवणे, जिल्हा एम्प्लॉयमेंट अधिकारी वाकोडे यांच्या उपस्थितीत होते.
कार्यक्रमाप्रसंगी आमदार मंजुळा गावित यांनी सांगितले की, तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांच्या हातास काम मिळावे म्हणून या मेळाव्याचे आयोजन साक्री येथे करण्यात आले. मेळाव्याच्या निमित्ताने शासनाच्या विविध योजनांचा आपल्याला फायदा कसा करुन घेता येईल याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. तालुक्यातील बेरोजगार युवक-युवतींना मेळाव्याच्या निमित्ताने आलेल्या कंपन्यांमध्ये नोकरीची संधी शैक्षणिक पात्रतेनुसार निश्चितच उपलब्ध होईल अशी मला अपेक्षा आहे. डिजीटल युगात विविध कौशल्य आत्मसात करुन रोजगाराच्या संधीचा फायदा घेणे आवश्यक आहे. मेळाव्याच्या निमित्ताने 25 नामांकित कंपन्यांचे अधिकारी उपस्थित झाले. स्वतः जिल्हा रोजगार अधिकारी यावेळी उपस्थित होती. शासनाच्या योजनांसंदर्भात युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
तालुक्यात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. रिकाम्या हातांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणुन शासनाच्या पंडित दिनदयाळ उपाध्याय जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन साक्री येथे करण्यात आले. या मेळ्याव्यात 400 उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. अशा मेळाव्याचे आयोजन दर तीन चार महिन्यानी आयोजीत केली जाईल असे प्रतिपादन डॉ. तुळशिराम गावित यांनी केले. साक्री येथे आयोजीत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मॉडेल करिअर सेंटर, धुळे जिल्हास्तरीय पंडित दिनदयाळ उपाध्याय जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्यात राज्यभरातुन 25 कंपन्यांनी सहभाग नोंदवीला.
रोजगार मेळाव्यास साक्री तालुक्यातील विविध गाव परिसरातुन सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींचा मोठा सहभाग नोंदवला. नोकरीची संधी उपलब्ध होणार असल्याने युवक युवती मध्ये उत्साहाचे वातावरण दिसुन आले. रा.नी.वाकुडे यांनी प्रास्ताविक केले. केशव बोरसे यांनी आभार मानले.
मेळावा यशस्वी करण्यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख डॉ. तुळशिराम गावित व त्यांच्या पक्षाचे प्रमुख पदाधिकारी पंकज मराठे, गोकुळ परदेशी, संभाजी अहिरराव, ॲड ज्ञानेश्वर एखंडे,ॲड नरेंद्र मराठे, शाम कोठावदे, अमोल सोनवणे, बाळा शिंदे, जितु नांद्रे, छोटुराम तोरवणे, राजधर देसले, मंगेश नेरे, धनराज भामरे, अजय सोनवणे, राहुल भोसले, कविता क्षिरसागर, रोहित दहिते, विनित सुर्यवंशी, अशोक मुजगे, राजेश बागुल, परेश वाणी, प्रकाश बच्छाव, बबलू चौधरी, बंटी वाघ, अजित बागुल, मंगलदास सुर्यवंशी, विजय भामरे, गोविंदा सोनवणे, गोटू चौरे,संतोष बोरकर व अन्य पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.