पिंपळनेर, जि.धुळे : पुढारी वृत्तसेवा
येथील न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 2 हजार 348 प्रकरणे तडजोडीअंती निकाली काढण्यात आली आहेत.
यावेळी सर्व शासकीय अधिकारी, बँक अधिकारी, साक्री तालुका वकिल संघाचे सर्व विधीज्ञ, पोलिस कर्मचारी उपस्थित होते. लोकन्यायालयात प्रमुख पॅनल न्यायाधीश म्हणून तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा न्यायाधीश कैलास अढायके व पॅनल सदस्य म्हणुन ॲड. एस. टी. कामडे यांनी काम पाहिले. यात दाखलपूर्व बँक प्रकरणे, फायनान्स कंपनीचे प्रकरणे, महावितरण कंपनी, एन. आय. एक्टची प्रकरणे तसेच ग्रामपंचायतींची एकूण 2 हजार 348 प्रकरणे तडजोडीअंती निकाली काढण्यात आली. तसेच तीनही न्यायालयातील एकूण 43 प्रलंबित प्रकरणांमध्ये तडजोड करण्यात आली असून त्यात फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे, एन. आय. एक्ट प्रकरणे, वैवाहीक प्रकरणे व दिवाणी प्रकरणात तडजोड करण्यात येवून निकाली काढण्यात आली. लोकअदालतीमध्ये साक्री तालुका वकिल संघाचे अध्यक्ष वाय. पी. कासार व सर्व विधीज्ञ यांनी सहभाग नोंदविला.