भाडणे (ता. साक्री, जि. धुळे) : 25 वर्षांनंतर भाडणे येथील पांझरा कान सहकारी साखर कारखाना सुरू होण्याची प्रक्रिया कार्यान्वित झाली आहे. ऊस उत्पादक शेतकरी, कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हा प्रकल्प चाळीत राहून जपला असल्याने सुरू होण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र कारखान्याचे हस्तांतरण आणि ताबा या दोन गोष्टी तांत्रिकदृष्ट्या भिन्न असल्याचे शिखर बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
स्थानिक कामगारांचे प्रतिनिधी व ग्रामपंचायत सदस्य तसेच माजी उपसरपंच धनंजय अहिरराव यांनी पत्रकार परिषदेत बोलताना याबाबत खुलासा करण्याची मागणी केली. ते म्हणाले, सध्या सुरू असलेल्या प्रक्रियेत तांत्रिक बाबींचा उल्लेख टाळला जात असून जणूकाही कारखाना त्वरित सुरू होणार असल्याचे चित्र रंगवले जात आहे. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे.
शिखर बँकेने या कारखान्याची राखीव किंमत 21 कोटी 36 लाख रुपये निश्चित केली होती. सहा सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या निविदेत पुणे येथील स्पायका ग्रीन एनर्जी या कंपनीला कारखाना 29 कोटी 1 लाख 41 हजार रुपयांना देण्याचे ठरले. नियमानुसार ठराविक टक्केवारीची रक्कम दोन दिवसांत भरावी लागते, तर उर्वरित 75 टक्के रक्कम 10 ऑक्टोबरपर्यंत जमा करणे आवश्यक आहे. मात्र कंपनीने केवळ काही रक्कम भरून मुदतवाढ मागितली असून आवश्यक सॉल्व्हन्सी सर्टिफिकेटही दिलेले नाही. त्यामुळे कंपनीची आर्थिक क्षमता संशयास्पद असल्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अहिरराव यांनी आरोप केला की, थोडी रक्कम भरून प्रक्रिया प्रलंबित ठेवणे, इतर स्पर्धकांना रोखणे आणि कारखान्याच्या अडीचशे एकर जमिनीची विल्हेवाट लावून फायदा करून घेण्याचा डाव दिसत आहे. प्रत्यक्षात दुसरी स्पर्धक कंपनी ‘विठाई शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज’ने नव्वद दिवसांत कारखाना सुरू करण्याचे आश्वासन दिले असताना असमर्थ कंपनीकडे कारखाना देण्यामागे कोणता हेतू आहे?
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, आता तरी कामगारांचे थकित देणे द्यावे. मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना त्यांच्या पात्रतेनुसार नोकरी द्यावी आणि वसाहतीतून कोणालाही बेघर करू नये, तसे झाल्यास आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
गुरुवार, दि. 9 ऑक्टोबर रोजी कारखान्याचे हस्तांतरण होणार असल्याच्या चर्चाही केवळ अफवा असून त्याला अधिकृत दुजोरा नसल्याचेही अहिरराव यांनी सांगितले. त्यांनी यावेळी जनतेला आवाहन केले की, प्रत्येक निवडणुकीआधी कारखान्याच्या नावाखाली दिशाभूल केली जाते. खरोखरच कारखाना सुरू होणार असेल तर आम्ही त्याचे स्वागत करू, मात्र जनतेसमोर सर्व तांत्रिक बाबी स्पष्ट व्हाव्यात अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.